• १५ ते १८ टक्के कर्करोगसदृश व्रण
  • कुंभमेळ्यातील मौखिक व दंतचिकित्सा तपासणीतील निष्कर्ष

सिंहस्थ कुंभमेळा दरम्यान झालेल्या दंतचिकित्सेत झालेल्या मौखिक व दंतचिकित्साविषयक तपासणीचा अहवाल जाहीर झाला असून त्यात ‘प्री-मालीग्नट लेसन’चा म्हणजेच अत्यंत धोकादायक असे व्रण ५० टक्के लोकांच्या तोंडात आढळून आल्याचे समोर आले आहे. त्यात कर्करोगाची भीती असलेले व्रण १५ ते १८ टक्के लोकांमध्ये आढळले. कुंभमेळ्यात सहभागी झालेल्यांमध्ये तंबाखू, चरस किंवा गांजा सेवनाच्या सवयी मोठय़ा प्रमाणात असल्याचे निष्पन्न झाले.

सार्वजनिक आरोग्य विभाग आणि हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ यांच्या सहकार्यातून कुंभमेळा दक्षता प्रकल्प राबवीत ही तपासणी करण्यात आली. इंडियन डेंटल असोसिएशन (आयडीए) या देशातील मौखिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेने येथील एमजीव्ही डेंटल कॉलेजच्या सहकार्यातून हा उपक्रम हाती घेतला होता. दंतचिकित्सा क्षेत्रातील तज्ज्ञ आणि स्थानिक दंतचिकित्सा महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी या सर्वेक्षणात सहभाग नोंदविला. या अहवालाची माहिती आयडीएचे मानद सरचिटणीस डॉ अशोक ढोबळे यांनी दिली.

जन-स्वास्थ्य चमूच्या माध्यमातून आणि मौखिक आरोग्य निगा उद्योगातील आघाडीच्या संस्थांना सामावून घेत ही मौखिक आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली. रुग्णांना नाशिक दंत महाविद्यालयाच्या तपासणीनंतर आणि त्यांत आढळलेल्या रोगांनुसार पुढील उपचारांसाठी समुपदेशन करण्यात आले. तोंडातील पोकळी आणि कीड यांच्यातील लाल आणि सफेद जखमा ज्या रुग्णामध्ये आढळून आल्या होत्या, त्यांचे समुपदेशन करण्यात आले. तत्काळ तंबाखू आणि सुपारी सोडून देण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला.

कुंभमेळ्यातील अनेक रुग्ण हे दूरवरून आणि ग्रामीण भागातून आले होते. या रुग्णांच्या आहारात योग्य प्रमाणात प्रथिने आणि इतर आवश्यक पोषक खाद्यपदार्थाचा अभाव होता. या रुग्णांना अधिक मोठय़ा प्रमाणावर रोगांची लागण होण्याची शक्यता होती. त्यांना आरोग्यपूर्ण आहार घेण्याचा आणि प्रक्रियायुक्त व गोड पदार्थ टाळण्याचा सल्ला देण्यात आला. देशात वैविध्यपूर्ण दंतमंजन वापरण्याची पद्धत आहे. आधुनिक टूथपेस्ट किंवा ब्रश वापरण्याऐवजी लोकांकडून राख, विटांची पावडर, मशेरी आणि कडुनिंबाच्या काडय़ा यांचा वापर केला जातो. तंबाखू, गांजा आणि चरस यांचा वापर केल्यास कर्करोग होण्याची शक्यता मोठय़ा प्रमाणवर वाढते आणि याचा विचार संबंधितांनी करण्याची गरज आहे.

आरोग्यावर परिणामा होण्याची भीती

ज्यांच्या चाचण्या करण्यात आल्या, त्यातील साधारणत: ८० टक्के लोकांमध्ये एक किंवा अधिक वाईट सवयी असल्याचे आढळून आले. त्यात तंबाखू, चरस किंवा गांजा सेवनाच्या सवयी मुख्यत्वे आढळल्या. त्यातील कित्येकांमध्ये दातांचे रोग आढळून आले असून दातांची दुर्गंधी आणि कीड यांचे प्रमाण मोठे होते. त्याशिवाय हिरडय़ांमधून रक्त येणे, कॅल्क्यूलस आणि पिरिओडोंटल पॉकेटस निर्माण होणे असेही पाहावयास मिळाले. कित्येक मुलांना दातांच्या दुर्गधींनी ग्रासले होते तर काहींच्या दातांचे आकार ओबडधोबड झाले आहेत. त्यांच्यावर तत्काळ उपचार करणे गरजेचे होते असेही त्यांनी नमूद केले. मौखिक आरोग्य तपासणीत तब्बल ५० टक्के लोकांची अवस्था वाईट असल्याचे दिसून आल्याने त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावरही होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.