News Flash

परवेझ कोकणी भाजपच्या बैठकीत

एकंदरीत बैठकीत कोणता निर्णय घेतला जाईल, याचा अंदाज प्रतिस्पध्र्यानी बांधणे सुरू केले आहे.

( संग्रहीत छायाचित्र )

विधान परिषद निवडणूकीत शिवसेनेला धास्ती

लोकसभेच्या पालघर मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेचा प्रस्ताव धुडकावत भाजपने दोन हात करण्याच्या घेतलेल्या भूमिकेचे प्रतिबिंब नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीवर पडणार असल्याचे दिसत आहे. अपक्ष उमेदवार कोकणी यांच्या पाठीशी पक्षाचे बळ उभे करण्याची रणनीती आखण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी रात्री मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तातडीची बैठक बोलावण्यात आली. परवेझ कोकणी यांनाही निमंत्रित करण्यात आल्याने शिवसेनेने धास्ती घेतली आहे. एकंदरीत बैठकीत कोणता निर्णय घेतला जाईल, याचा अंदाज प्रतिस्पध्र्यानी बांधणे सुरू केले आहे. या घडामोडींनी विधान परिषदेच्या निवडणुकीत अधिकच रंग भरणार आहे.

विधान परिषदेच्या तिरंगी लढतीत अधिकृत उमेदवार देणे टाळणाऱ्या आणि १७८ संख्याबळ असणाऱ्या भाजपच्या भूमिकेकडे शिवसेनेसह काँग्रेस आघाडीचे लक्ष आहे. अधिकृत उमेदवार न देणारा भाजप आपल्यासोबत येईल, असे गृहीत धरणाऱ्या शिवसेनेला अर्ज भरण्याच्या दिवशी आयोजित संयुक्त बैठकीस अनुपस्थित राहून भाजपने धक्का दिला. उलट भाजपशी संबंधित परवेझ कोकणी यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवत सेनेला शह देण्याचा मनसुबा प्रगट केला.

राज्य आणि केंद्रात एकत्रितपणे सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेना-भाजपमध्ये कमालीचे वितुष्ट आहे. सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचे आधीच जाहीर केले आहे. या घडामोडीत लोकसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये एका जागेवर भाजपने माघार घ्यावी आणि दुसऱ्या जागी सेना उमेदवार देणार नाही, असा प्रस्ताव पुढे ठेवण्यात आला. भाजपने त्याकडे दुर्लक्ष करत पालघरमध्ये उमेदवारी कायम ठेवली. राजकीय पटलावरील या वादाचे पडसाद विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघातील  निवडणुकीत उमटणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

मतदानात जादूई आकडा स्वबळावर गाठण्याइतपत एकाही पक्षाचे संख्याबळ नाही. सर्वाधिक २०७ सदस्य असणाऱ्या शिवसेनेने जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे यांना, तर १७१ सदस्य असणाऱ्या काँग्रेस आघाडीने अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांना रिंगणात उतरवले आहे. भाजपशी संबंधित परवेझ कोकणी यांच्या उमेदवारीने ही लढत अधिक चुरशीची बनली आहे.

प्रारंभी भाजपला आपलेसे करण्याचा प्रयत्न सेनेच्या उमेदवाराने केला, परंतु त्याला स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दाद दिली नाही. विधान परिषद निवडणुकीत पक्षाची भूमिका ठरविण्यासाठी मंगळवारी रात्री मुंबईत बैठकीचे आयोजन करण्यात आले. पक्षाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांनी दिवसभरात स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. रात्री मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्या उपस्थितीत सर्व आमदार, नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन अंतिम निर्णय होणार असल्याचे शहराध्यक्ष आ. बाळासाहेब सानप यांनी सांगितले. या बैठकीचे संदेश दुपारी बारा ते एकच्या दरम्यान स्थानिक पदाधिकारी, नगरसेवकांपर्यंत पोहोचविण्यात आले. प्रत्येकाची मुंबईला जाण्याची लगबग सुरू झाली. या बैठकीत नेमके काय घडणार, याचे आडाखे शिवसेनेसह काँग्रेस आघाडीच्या नेत्यांकडून बांधले जात आहे.

विधान परिषद निवडणुकीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांशी यापूर्वीच चर्चा झाली आहे. भाजपने आपणास पाठिंबा देण्याची तयारी आधीच दर्शविलेली आहे. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मुंबई येथे होणाऱ्या बैठकीत त्याबाबत अधिकृत घोषणा होईल ही अपेक्षा आहे.

परवेझ कोकणी, अपक्ष उमेदवार, विधान परिषद

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2018 1:43 am

Web Title: nashik legislative council election bjp
Next Stories
1 ठराविक दुकानांमध्ये शैक्षणिक साहित्य खरेदीची सक्ती
2 सर्वाधिक पावसाच्या इगतपुरी तालुक्यात टंचाईच्या झळा
3 औरंगाबादच्या दंगलग्रस्तांना भरपाई द्यावी – अजित पवार
Just Now!
X