पोलिसांकडून गस्तीचे नियोजन

नाशिक : सरत्या वर्षांला हसतमुखाने निरोप देत नव्या वर्षांचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी नाशिककर सज्ज झाले आहेत. नाशिककरांचा हा उत्साह आपल्यासाठी फायदेशीर ठरावा म्हणून व्यावसायिक सक्रिय झाले आहेत. सरत्या वर्षांला निरोप देण्यासाठी काही मंडळी जवळपासच्या पर्यटन स्थळावर मुक्काम ठोकण्याच्या तयारीत आहेत. तर काहींनी पार्टीचे नियोजन सुरू केले आहे. या सर्व हालचालींवर पोलिसांचे लक्ष असून गर्दीच्या ठिकाणांसह अन्य ठिकाणी गस्त राहणार आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या मदतीने ‘तळीरामांसह’ समाजकंटकांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

सर्वसामान्यांपुढील समस्या आजही कायम असल्या तरी नवीन वर्षांत काही बदल होईल, अशी त्यांना आशा आहे. त्यामुळेच नवीन वर्षांच्या स्वागतासाठी सर्वसामान्यही सज्ज झाले आहेत. शहरातील हॉटेल, बीअरबार, खासगी कार्यालये तसेच दुकानांमध्ये यानिमित्ताने आकर्षक विद्युत रोषणाई तसेच सजावट करण्यात आली आहे. हॉटेलच्या वतीने काही विशेष सवलती जाहीर करण्यात आल्या असून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जोडी, कुटुंब यांच्यासाठी जेवण, मनोरंजक स्पर्धामध्ये काही सवलती ठेवण्यात आल्या आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून शहराबाहेरील ठिकाणी नववर्ष स्वागताची तयारी करण्यात आली आहे. काहींनी खाद्यभ्रमंतीला प्राधान्य देत कोणत्या हॉटेलकडून किती सवलत आहे, याचा अभ्यास करून कोणते हॉटेल निश्चित करायचे यावर खलबत सुरू केले आहे. थंडीची वाढती तीव्रता पाहता शेकोटीच्या अवतीभोवती, मोकळ्या जागेत सांस्कृतिक कार्यक्रमांसह मेजवानीचा आनंद लुटण्याकडे अनेकांचा कल आहे. या कोलाहालापासून दूर जात काही कुटुंबांनी शहराजवळील घोटी, इगतपुरी, त्र्यंबक, दिंडोरी भागातील कृषी पर्यटन स्थळ किंवा फार्म हाऊस परिसरात मुक्काम हलविला आहे.

नागरिकांच्या उत्साहाला आलेले उधाण पाहता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहर पोलीस सक्रिय झाले आहेत. जिल्ह्य़ात ठिकठिकाणी कोम्बिंग ऑपरेशनसह वेगवेगळ्या मोहिमेच्या माध्यमातून समाजकंटकावर नजर ठेवली जात आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री मद्यप्रेमींचा होणारा धिंगाणा पाहता तळीरामांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारतांना समाजकंटकांवर वचक राहण्यासाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या मदतीने शहर परिसरातील गर्दीची ठिकाणे, निर्जनस्थळी बंदोबस्त तसेच गस्तीच्या माध्यमातून देखरेख राहणार असल्याचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले.

सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

नववर्षांच्या पूर्वसंध्येला काही चांगले संकल्प घेऊन नवीन वर्ष वेगळ्या प्रकारे साजरा करावा, या संकल्पनेतून विश्वास ग्रुपतर्फे ‘फ्यूजन २०१९ संगम सप्तकलांचा’ या अनोख्या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी सहा वाजता सावरकर नगर येथील विश्वास गार्डन येथे शब्द-सूर-ताल-रंगरेषा यांची मैफल रंगणार आहे. या मध्ये मकरंद हिंगणे, मिलिंद धंटिगण, विवेक केळकर, मीना परुळेकर-निकम, शुभंकर हिंगणे, तन्मयी घाडगे, दिशा दाते, जुई आंबेकर, डॉ. सुमुखी अथनी, दत्ता पाटील, सचिन शिंदे, लक्ष्मण कोकणे, भारती हिंगणे, नितीन वारे, अमोल पाळेकर, रागेश्री धुमाळ आदी सहभागी होणार आहेत.