बससेवा बंदच; तोडफोडप्रकरणी १५ हून अधिक अटकेत

त्र्यंबकेश्वरच्या तळेगाव अंजनेरी येथे चिमुरडीबाबत घडलेल्या दुर्दैवी प्रकारानंतर रविवारी सकाळपासून शहर व ग्रामीण भागात उफाळून आलेला जनक्षोभ सोमवारी हळूहळू कमी होत असला तरी काही भागात तणावपूर्ण शांतता आहे. जनजीवन पूर्वपदावर येत असताना काही ठिकाणी आंदोलनाचा प्रयत्न झाला. काही किरकोळ अपवादवगळता अनुचित प्रकार घडला नाही. खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील बहुतांश शाळा व महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली. नाशिक-मुंबई व इतर मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. परंतु, नुकसानीत होरपळलेल्या एसटी महामंडळाने सोमवारी शहर व बाहेरगावी जाणाऱ्या बसेस रस्त्यावर आणल्या नाहीत. संवेदनशील गावांमध्ये तसेच प्रमुख महामार्गावर मोठा पोलीस फौजफाटा तैनात झाला आहे. आदल्या दिवशी ठिकठिकाणी झालेली बसची जाळपोळ व तोडफोड प्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून शहर-ग्रामीण भागातून १५ हून अधिक जणांना अटक करण्यात आली. समाज माध्यमांवरून अफवा पसरविणाऱ्यांची शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. नाशिक पोलीस आयुक्तालयाने शांतता समितीची तातडीने बैठक घेऊन शांततेचे आवाहन केले.

तळेगाव अंजनेरीच्या घटनेचे पडसाद शहर व ग्रामीण भागात उमटले. समाजमाध्यमांवरून पसरलेल्या अफवांमुळे स्थिती नियंत्रणात आणताना पोलिसांच्या नाकीनऊ आले. संतप्त जमावाने एसटी बसगाडय़ा, पोलीस तसेच खासगी वाहने पेटविल्याने स्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे चित्र निर्माण झाले. जमावाच्या दगडफेकीत ४० पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले.

नाशिक-त्र्यंबकेश्वर, नाशिक-इगतपुरी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे थांबविण्यात आली. ग्रामीण भागात ही स्थिती असताना शहरात वाहनांवरून फिरणाऱ्या युवकांच्या समूहाने गोंधळ घालत व्यावसायिक व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले. महात्मानगर व काही भागात मराठा क्रांती मोर्चाचे स्टिकर लावलेल्या वाहनांची तोडफोड झाली. या एकंदर स्थितीमुळे सोमवारी कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.

नाशिक-मुंबई महामार्गावरील वाहतूक बंद असल्याने वाहनांच्या मोठय़ाच मोठय़ा रांगा लागल्या होत्या. हजारो प्रवासी अडकून पडले होते. रविवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

वाहतूक खुली झाली असली तरी एसटी महामंडळाने बस वाहतूक सुरू केली नाही. पाडळी येथे जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला होता. यावेळी रबरी गोळ्यांचा वापर करण्यात आल्याचे वरिष्ठांकडून सांगण्यात आले. जाळपोळ व तोडफोड प्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असून सात संशयितांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित संशयितांचा शोध गावोगावी सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी सांगितले. संवेदनशील गावांसह तळेगाव अंजनेरी येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षकांनी नाशिक ते घोटी दरम्यानच्या गावांना भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकडय़ा दाखल झाल्या आहेत. नुकसानग्रस्त एसटी गाडय़ा घटनास्थळावरून नेतांना स्थानिकांनी विरोध दर्शविला. त्यामुळे पोलीस संरक्षणात या गाडय़ा दुरुस्ती विभागाकडे रवाना करण्यात आल्या. खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारी शिक्षण संस्थांनी शाळा व महाविद्यालयांना सुटी जाहीर केली होती. याची कल्पना नसल्याने अनेकांना शाळेत येऊन माघारी फिरावे लागले. शासकीय कार्यालये, बाजारपेठ, खासगी आस्थापना यांचे काम नेहमीप्रमाणे सुरू होते.

शांततेचे आवाहन

सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्यास कारक ठरलेली अवैध दारुविक्री, मराठा क्रांती मोर्चा वा विशिष्ट स्टिकर असणाऱ्या वाहनांची होणारी तोडफोड, समाजमाध्यमांवरून पसरविल्या जाणाऱ्या अफवा, अशा विविध मुद्यांवर पोलीस आयुक्तालयाने आयोजिलेल्या शांतता समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. शहर व ग्रामीण भागातील स्थिती सुधारण्यासाठी पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी सर्व समाजघटकांना शांतता पाळण्याचे आवाहन करण्यात आले. महापौर अशोक मुर्तडक, माजी महापौर प्रकाश मते, मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी, रिपाइंचे नेते यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. अवैध मद्यविक्रीमुळे अनेक ठिकाणी वातावरण कलुषित होत असल्याची तक्रार काहींनी केली. शहरात असे कुठे घडत असल्यास आपल्याकडे तक्रार करावी, असे सिंघल यांनी सांगितले. त्र्यंबकेश्वर येथे घडलेल्या घटनेचा पोलीस योग्य पद्धतीने तपास करत आहेत. त्याचे पडसाद स्थानिक पातळीवर उमटणार नाही याची दक्षता सर्वानी घेणे गरजेचे आहे. अशांतता पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. समाज माध्यमांवरून अफवा पसविणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. काही विशिष्ट स्टिकर लावलेली वाहनांची तोडफोड केली जात असल्याच्या तक्रारीवर आयुक्तांनी वाहनांवर या पद्धतीने स्टिकर लावणे नियमाला धरून नसल्याचे सांगितले. ज्या स्टिकरमुळे आपली जात वा धर्म समोर येईल, असे स्टिकर लावू नये असे आवाहन त्यांनी केले. शहरात गोंधळ घालणाऱ्यांविरुद्ध वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून सात जणांना अटक करण्यात आल्याचे सिंघल यांनी सांगितले.