मंदीच्या छायेत सापडलेल्या शहरासह जिल्ह्य़ातील औद्योगिक क्षेत्रास जागतिक पटलावर उद्भवलेल्या ‘करोना’च्या नव्या संकटामुळे झळ सोसावी लागणार आहे. स्थानिक पातळीवर वाहन, इलेक्ट्रिकशी संबंधित उद्योगांच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी अनेक लहान-मोठे पुरवठादार चीनमधून कच्चा माल मागवितात. त्या मालाचा पुरवठा थांबला आहे. देशांतर्गत कच्चा माल घ्यायचा म्हटला तर आर्थिक समीकरण जुळत नाही. वेळेत काम करावयाचे असल्याने काहींनी जादा किंमत मोजून स्थानिक पातळीवर काम करवून घेतले. यानिमित्ताने लघू उद्योगांना जादा काम मिळणार असल्याकडे लक्ष वेधले जात आहे.

देशात ३१ मार्चपासून बीएस-चार प्रकारातील वाहनांचे उत्पादन पूर्णत: थांबणार आहे. वाहन उद्योगांना एक एप्रिलपासून बीएस-सहा प्रकारातील वाहने उत्पादित करावी लागतील. या निर्णयामुळे महिंद्रूा अ‍ॅण्ड महिंद्रा, डिझेल वाहनांचे इंजिन तयार करणारी बॉश या उद्योगांना गेल्या वर्षी उत्पादनात कपात करावी लागली होती. अनेक महिने आठवडय़ातील दोन-तीन दिवस उत्पादन बंद ठेवून कामगारांना सुट्टी दिली गेली. या चक्रातून उद्योग बाहेर पडले नसतांना करोनाचे संकट उभे ठाकले. जिल्ह्य़ात करोनाचा एकही रुग्ण अद्याप आढळलेला नाही. परदेशातून आलेल्या संशयितांना वैद्यकीय देखरेखीत ठेवण्यात आले आहे. करोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी नाशिक इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनने (निमा) पुढील १५ दिवसात आयोजित सर्व कार्यक्रम, कार्यशाळा, उपक्रम पुढील सूचना येईपर्यंत रद्द केले आहेत. लहान-मोठय़ा कारखान्यात एका सत्रात शेकडोंच्या संख्येने कामगार कार्यरत असतात. तिथे आवश्यक ती दक्षता घेतली जात असली तरी उद्योगांसमोर वेगळाच प्रश्न आहे. नाशिक फर्स्ट संस्थेचे अध्यक्ष अभय कुलकर्णी यांनी उद्योगांची स्थिती कथन केली. वाहन, इलेक्टिक कारखान्यांचे पुरवठादार कच्च्या मालासाठी चीनवर अवलंबून आहेत. करोनामुळे तिकडून माल येणे बंद झाले. स्थानिक पातळीवरून कच्चा माल घेतल्यास किंमत वाढते. आर्थिक वर्ष संपण्याच्या काळात हे संकट उभे ठाकले. यामुळे उत्पादनात ३० टक्के घट होणार असल्याचा अंदाज कुलकर्णी यांनी व्यक्त केला. विदेशातून भारतात येणाऱ्यांना व्हिसा मिळत नाही. औद्योगिक क्षेत्रातील कामांसाठी विदेशातील संबंधित मंडळी येण्यास उत्सुक नाही. उत्पादन कमी झाल्यास बेरोजगारीचे प्रमाण वाढेल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

सिटू संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी करोनामुळे कारखान्यांच्या उत्पादनावर आतापर्यंत थेट परिणाम जाणवला नसला तरी पुढील काळात तो लक्षात येईल असे नमूद केले. चीनच्या कच्च्या मालावर अवलंबून उद्योगात आधी शिल्लक मालावर आतापर्यंत काम भागले. एप्रिल, मे महिन्यानंतर मालाच्या तूटवडय़ाचे परिणाम दिसू लागतील. या वातावरणात सरकारने उद्योजक आणि कामगारांचे मनोबल उंच ठेवायला हवे. परंतु, तसे घडत नाही. करोनाची चर्चा, राजकीय अस्थिरता, देशात काही भागात झालेल्या दंगली या घटना मंदी गडद करीत आहेत. अर्थसंकल्पातून मध्यम, लघू उद्योगांना दिलासा मिळालेला नाही. आजही त्यांची स्थिती खालावलेली असल्याचे कराड यांनी सांगितले.

महिंद्रच्या नाशिक प्रकल्पात वार्षिक सुमारे १८ हजार वाहनांचे उत्पादन केले जाते. वाहन उद्योगातील मंदीच्या फेऱ्याने बॉश आणि टायर उत्पादित करणाऱ्या सीएटलाही झळ बसलेली आहे. महिंद्राने बीएस-सहा प्रकारातील वाहनांच्या उत्पादनाची तयारी केली. महिंद्राच्या नाशिक प्रकल्पात फेब्रुवारीत २५ लाख वाहन निर्मितीचा टप्पा गाठण्यात आल्याचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला होता. प्रकल्पात उत्पादन करण्यात आलेले २५ लाखावे वाहन स्कॉर्पिओ होते. ३९ वर्षांत हा पल्ला गाठला. पुढील २५ लाखाचा टप्पा यापेक्षा कमी कालावधीत गाठण्याचा संकल्प व्यवस्थापनाने केला आहे. बीएस-सहा आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीसाठी सज्ज असल्याचे महिंद्राच्या व्यवस्थापनाने म्हटले होते. औद्योगिक क्षेत्रातील दोन हजार लहान-मोठय़ा उद्योगात सुमारे सव्वा लाखाहून अधिक कामगार काम करतात. करोनाच्या धास्तीमुळे औद्योगिक उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

चीनमधील कच्च्या मालावर अवलंबून लहान-मोठय़ा उद्योगांना देशांतर्गत तसेच स्थानिक पातळीवर पर्याय शोधावे लागतील. काही पुरवठादारांनी त्या अनुषंगाने पावले उचलली आहेत. चीनमधून कमी किंमतीत मिळणारा कच्चा माल आज ते वेळेत काम पूर्ण करण्यासाठी स्थानिक लघू उद्योजकांकडून करवून घेत आहेत. मोठय़ा उद्योगांना पुढील काळात तसा विचार करावाच लागेल. करोनाच्या स्थितीमुळे चीनमधून जितके दिवस कच्चा माल येणार नाही, तितके दिवस लघू उद्योगांना पर्याय उपलब्ध करण्याची संधी मिळणार आहे.

– तुषार चव्हाण (मानद सरचिटणीस, निमा)