अधिकाऱ्यांना कार्यालयात डांबले

नाशिक : ‘बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क’ विषयाच्या फेरतपासणीचा निकाल जाहीर करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने बुधवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्र कार्यालयाला कुलूप लावण्याचा प्रयत्न झाला. परंतु विद्यापीठाने हा प्रयत्न हाणून पाडत विद्यार्थी प्रतिनिधींसोबत चर्चेचा पर्याय खुला केला. दरम्यान, आंदोलकांनी यावेळी कुलूप लावता न आल्याने कार्यालयात अधिकाऱ्यांना डांबले.

विद्यापीठाच्या तृतीय वर्ष वाणिज्य शाखेचा निकाल जून महिन्यात लागला आहे. या निकालात ७५ टक्के विद्यार्थी हे ‘बिझनेस रेग्युलेटरी’ या विषयात नापास झाले. विद्यार्थ्यांनी आवश्यक अभ्यास करत विषय प्रश्नपत्रिका व्यवस्थित सोडवूनही निकाल अनपेक्षित लागला. याबाबत १२ जून रोजी विद्यापीठाच्या उपकेंद्रात आंदोलन करण्यात आल्यानंतर विद्यापीठाने पुनर्मूल्यांकनची जोडणी खुली करण्याचे आश्वासन दिले होते. जोडणी खुली झाली, परंतु तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरता आले नाहीत. तसेच ३० जून रोजी फेरनिकाल लावला जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. विद्यापीठाकडून दोन्ही आश्वासने पाळण्यात आली नाही. याचा निषेध नोंदविण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने पुणे येथे कुलगुरूंच्या दालनात ठिय्या दिला होता. कुलगुरूंनी पुनर्मूल्यांकनची जोडणी खुली केली. परंतु विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासल्या नसल्याचे त्यात लक्षात आले. विद्यार्थ्यांच्या संतप्त भावना पाहता ८ जुलै रोजी निकाल जाहीर होईल आणि तो विद्यार्थ्यांच्या हिताचा असेल, असे आश्वासन कुलगुरूंनी दिले होते. परंतु १० जुलै उजाडला तरी अद्याप विद्यार्थ्यांच्या हातात सुधारित निकाल नाही. याचा जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी येथील विद्यापीठाच्या उपविभागीय केंद्रास कुलूप लावण्याचा प्रयत्न केला. परंतु अधिकाऱ्यांनी स्वतहून कार्यालयाचे दरवाजे आतून बंद करून घेत विद्यार्थ्यांसमोर चर्चेचा पर्याय ठेवला. विद्यार्थी तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शिष्टमंडळ उपकेंद्र अधिकाऱ्यांच्या दालनात पोहोचले. त्यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. येत्या ४८ तासांच्या आत निकाल न लागल्यास पुणे विद्यापीठ आणि नाशिक उपकेंद्र येथे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. यावेळी विद्यार्थ्यांनी उपकेंद्राच्या आवारात घोषणाबाजी केली.  यासंदर्भात रुपाली प्रसाद या विद्यार्थिनीने आपण महाविद्यालयात कायम पहिल्या श्रेणीत असताना या विषयात नापास कशी होऊ शकते, असा प्रश्न विचारला. आमच्या उत्तरपत्रिकाही योग्य पद्धतीने तपासल्या नसून अनेक त्रुटी असल्याचा आरोप तिने केला. निकाल जाहीर करण्यास विलंब होत असल्याने पुढील प्रवेशाचे मार्ग बंद होण्याच्या स्थितीत आहे. उपकेंद्रातील अधिकाऱ्यांनी निकाल लवकर घोषित करण्याचे आश्वासन दिले असले तरी हे आश्वासन लेखी स्वरूपात मिळणे गरजेचे आहे. परंतु अधिकारी याबाबत चालढकल करत असल्याची तक्रार रुपालीने केली. विद्यापीठाची चालढकल पाहता संतप्त विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांना त्यांच्या दालनात डांबले. यावेळी प्रदेश सरचिटणीस श्रेयांश सराफ, नंदन भास्करे, आकाश कदम आदी उपस्थित होते.