टपाल व काही राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांमध्ये शाई लावत चलन बदलून देण्याचे काम सुरू झाले असले तरी शुकवारपासून केवळ दोन हजार रुपये देण्याचे फर्मान निघाल्याने सर्वसामान्यांमधील अस्वस्थता वाढली आहे. दिवसागणिक बदलणाऱ्या नियमावलीने गोंधळात भर पडली आहे. नवव्या दिवशी स्थितीत फारशी सुधारणा झाली नाही. सुटय़ा पैशांअभावी बाजारपेठेतील बहुतांश व्यवहार थंडावलेले आहेत. दैनंदिन खर्च करणे अवघड झाले असताना पैसे बदलण्याची मर्यादा कमी केल्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रीयकृत बँकांकडून चलन मिळविण्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या नागरी सहकारी बँकांना शुक्रवारी चलन मिळणार आहे.

पंतप्रधानांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यापासून उद्भवलेला चलनकल्लोळ अजूनही कायम आहे. नोटा बदलविणे, बोटाला शाई लावणे, नोटा बदलविण्याची मर्यादा कमी-अधिक करणे या प्रकाराने ग्राहकच नव्हे तर बँकेतील कर्मचारीही त्रस्तावले आहे. गुरूवारी टपाल विभागासह काही राष्ट्रीयकृत बँकांमध्ये शाईचे वितरण झाल्यामुळे ग्राहकांच्या बोटावर ती लावून नोटा बदलून देण्याचे काम झाले. बहुतांश बँक शाखांमध्ये या दिवशीही नोटा बदलण्यासाठी ग्राहकांच्या रांगा कायम राहिल्या.

दुपारच्या सुमारास दोन हजार रुपयांहून अधिक नोटा बदलवून मिळणार नसल्याची माहिती समजल्यानंतर या रांगांमध्ये अधिकच वाढ झाली. नोटा बदलविण्यावर मर्यादा आणल्याने नागरिक वैतागले आहेत. या रोषाला बँक कर्मचाऱ्यांना तोंड द्यावे लागत असल्याने शुक्रवारपासून काय होईल, याची धास्ती संबंधितांमध्ये आहे. सुटे पैसे नसल्याने अनेक व्यवहारांवर परिणाम झाला. व्यापारी व बहुतांश दुकानांतील उलाढाल मंदावली आहे. कुठे उधारीत तर कुठे डेबिट वा क्रेडीट कार्डच्या स्वरुपात व्यवहार सुरू आहे. परंतु, त्यांचे प्रमाण अत्यल्प असल्याची व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया आहे. टपाल कार्यालयाच्या ४८ शाखांमधून दिवसभरात एक कोटी रुपयांचे वितरण करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. टपाल कार्यालयात शाई लावून नोटा वितरित केल्या जात आहेत. सहकारी बँकांपर्यंत अद्याप ही शाई पोहोचलेली नाही.

देशभरात चलन तुटवडा भेडसावत असल्याने पैसे बदलून घेण्याची साडे चार हजार रुपयांची मर्यादा दोन हजार रुपयांवर आणण्यात आली आहे. यामुळे नागरिकांची अधिक अडचण होणार असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. आपले पैसे बदलण्यासाठी कित्येक तास रांगेत उभे रहावे लागते. त्यात पैसे मिळतीलच याची शाश्वती नसते.

त्यात ही मर्यादा कमी केल्याचा फटका सर्वाना बसणार असल्याकडे नागरिक लक्ष वेधतात. चलन तुटवडय़ाच्या समस्येतून सहकारी बँकांची शुक्रवारी सुटका होणार आहे. नोटांचा कंटेनर नाशिकमध्ये दाखल झाला आहे. यामुळे राष्ट्रीयकृत बँकांकडून सहकारी बँकांना चलन उपलब्ध करून दिले जाईल, अशी अपेक्षा विश्वास सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केली.