नायलॉन मांजाविक्रीवर प्रशासनाने बंदी घातली असताना आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी विक्रेत्यांवर कारवाई सुरू केली असतानाही शहरात नायलॉन मांजाचा वापर सुरू असल्याचे विविध घटनांमधून पुढे येत आहे. गुरुवारी दुपारी इंदिरानगर भागात मांजा गळ्यात अडकून दुचाकीस्वार जखमी झाला. त्याला सात टाके पडले. नायलॉन मांजामुळे दुर्घटना वाढत असून या मांजाचा वापर करणाऱ्यांवर नियंत्रण मिळवणे अवघड झाल्याचे चित्र आहे.

मकरसंक्रांतीच्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या पतंगोत्सवाची धूम आधीच सुरू झाली आहे. तत्पूर्वीच वन विभागाने नायलॉन मांजाने दोन वर्षांत ६६ पक्ष्यांचा मृत्यू, तर ३०० हून अधिक पक्षी जखमी झाल्याची आकडेवारी जाहीर केली होती. पतंगोत्सवात नायलॉन मांजावर बहिष्कार टाकण्याचे सर्व स्तरांवरून आवाहन करूनही त्याची विक्री, वापर काही थांबलेला नाही. काही दिवसांपूर्वी नायलॉन मांजा गळ्यात अडकून दुचाकीवर जाणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला होता. नुकताच मखमलाबाद-हनुमानवाडी रस्त्यावर दुचाकीवर जाणाऱ्या युवतीचा नायलॉन मांजाने गळा कापला गेला. गळ्यात ओढणी असल्याने सुदैवाने युवती किरकोळ जखमी झाली. गुरुवारी नायलॉन मांजाने दुखापतीची पुनरावृत्ती झाली. यात मयूर कुलकर्णी (३५) हे जखमी झाले. काही कामानिमित्त दुचाकीवरून जात असताना गळ्याभोवती मांजा घासला जाऊन ते जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन त्यांना खासगी रुग्णालयात नेले. मांजामुळे त्यांना सात टाके पडले. नायलॉन मांजामुळे घडलेली ही तिसरी घटना आहे. वीजतारा, झाडांवर अडकून पडलेल्या नायलॉन मांजा नागरिकांसह पक्ष्यांच्या जिवावर बेतत आहे.

नायलॉन मांजामुळे महिलेचा बळी गेल्यानंतर प्रशासन सक्रिय झाले. पंचवटी पोलिसांनी पवन अंडी सेंटरसह पेठ रस्त्यावर छापे टाकून सुमारे ७० हजार रुपये किमतीच्या नायलॉन मांजाच्या ११० फिरक्या जप्त केल्या. महापालिकेच्या पथकांनी विक्रेत्यांकडे छाननी केली, पण त्यांना नायलॉन मांजा आढळून आला नाही. पोलीस कारवाई सुरू झाल्यामुळे विक्रेते सतर्क झाले असून छुप्या पद्धतीने नायलॉन मांजाची विक्री सुरू असल्याचे सांगितले जाते. शहरात सर्व भागांत मांजाविक्रेत्यांची छाननी करून नायलॉन मांजाच्या बेकायदेशीर विक्रीवर नियंत्रण मिळवण्याची गरज आहे. पतंगोत्सव शहरात सर्व भागांत उत्साहात साजरा केला जातो. बंगला, घरे वा इमारतीच्या गच्चींवर मुले जमून पतंग उडवितात. संबंधितांकडून नेमक्या कोणत्या मांजाचा वापर होत आहे याची छाननी करणे अवघड आहे.

मांजात अडकलेल्या पक्ष्याची सुटका

नायलॉन मांजामुळे या वर्षीही पक्षी जखमी होण्याच्या घटना वाढत आहेत. इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकवरील झाडात नायलॉन मांजात अडकलेल्या कावळ्याची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. जॉगिंग ट्रॅकवरील निलगिरी झाडावर मांजात पक्षी अडकल्याचे विधीपती नेहे यांच्या लक्षात आले. कावळ्याची केविलवाणी तडफड पाहून त्यांनी अग्निशमन दलास माहिती दिली. सिडको अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. उंच शिडी मागविण्यात आली. अथक प्रयत्नांती पक्ष्याची मांजातून सुटका करण्यात आली. दलाचे श्याम राऊत, मुकुंद सोनवणे, वाहनचालक इस्माईल काजी, संजय गाडेकर, मोईन शेख, सोमनाथ शिंदे आदींनी  पक्ष्याची सुटका करण्यासाठी परिश्रम घेतले.