शहापूर येथील वयोवृध्द असलेल्या मेंदूमृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी अवयव दानाबाबत सजगता दाखविल्याने अनेकांच्या जीवनात नवी पहाट येणार आहे. पोलीस विभागाचे सहकार्य आणि भानुशाली कुटूंबियांच्या पुढाकारामुळे नाशिक-पुणे ‘ग्रीन कॉरिडोर’ मार्फत ऋषिकेश हॉस्पीटलमधून मानवी अवयव पुण्याला रवाना करण्यात आले. तेथील सह्य़ाद्री हॉस्पिटलमधील काही रुग्णांवर अवयवांचे प्रत्यारोपण करण्यात येईल. या माध्यमातून संबंधित रुग्णांच्या आयुष्यात नवीन पहाट उगवणार आहे.
शहापूर येथील निवृत्त अधिकारी सुभाष भानुशाली (६९) यांचा काही दिवसांपूर्वी रक्तदाब वाढल्याने त्यांना येथील सह्य़ाद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र दिवसागणिक त्यांची स्थिती बिघडत असतांना त्यांची अवस्था वैद्यकीय भाषेत मेंदू मृत व्यक्ती अशी झाली. याबाबत पुणे येथील प्रत्यारोपण केंद्राशी रुग्णालयातील डॉक्टरांनी संपर्क साधला. या कालावधीत डॉक्टरांचे समुपदेशन आणि कुटूंबियांच्या अवयवदान सजगतेमुळे त्यांनी भानुशाली यांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. पुणे येथील अवयव प्रत्यारोपण केंद्राने रात्री उशिराने ऋषिकेश हॉस्पिटलशी संपर्क साधला. यावेळी डॉ. संजय रकिबे यांनी त्यांची तपासणी करत भानुशाली यांना ऋषिकेश हॉस्पिटलमध्ये हलविण्याचा निर्णय घेतला. डॉ. भाऊसाहेब मोरे, डॉ. रकिबे, डॉ. अनिरूध्द ढोकरे आणि सहकाऱ्यांनी तीन -चार तासांच्या शस्त्रक्रियेनंतर दोन्ही किडनी, दोन डोळे, यकृत, पोटातील रक्त वाहिन्या आणि त्वचा काढली.
हे सर्व अवयव पुणे येथील रुग्णालयात दाखल रुग्णांसाठी न्यायचे होते. त्यासाठी पोलीस यंत्रणेला पूर्वकल्पना देण्यात आली. याआधी या पध्दतीने अतिशय कमी वेळात असे अवयव अल्पावधीत पुण्याला नेण्यात आले आहे. या अवयवांचे गरजू रुग्णांवर तातडीने प्रत्यारोपण गरजेचे असते. वाहतूक पोलिसांनी संपूर्ण सज्जता ठेवत ही रुग्णवाहिका कुठेही कोंडीत अडकणार नाही याची दक्षता ठेवत तिला मार्गस्थ केले. त्यासाठी शहरातील सिग्नल, प्रमुख रस्त्यांवरील व चौकातील वाहतूक काही काळासाठी थांबविण्यात आली. काही मिनिटांत रुग्णवाहिका शहरातून पोलीस बंदोबस्तात पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली.