अनिकेत साठे

काढणीसाठी मजूर नाही. शेतातून कांदा निघालाच तर बाजारपेठेपर्यंत नेण्यात अडचणी. यावर मात करत घाऊक बाजारात कांदा आणला तरी अपेक्षित भाव मिळत नाही. जिल्ह्य़ातील काही निवडक बाजार समित्यांमध्ये सध्या कांदा लिलाव होत आहे. सहा बाजार गावबंदी, मजूरटंचाई आणि करोनामुळे क्षेत्र प्रतिबंधित झाल्याने बंद आहेत. टाळेबंदीच्या काळात २६०० मालमोटारी इतका कांदा नाशिकमधून राज्यासह देशांतर्गत बाजारात पाठवला गेला. पण, दर ३०० रुपयांनी घसरले. पुढील काळात प्रचंड आवक होऊन त्याचाही फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागेल, असे चित्र आहे.

करोनामुळे लागू झालेल्या टाळेबंदीत कृषिमाल पुरवठय़ाची साखळी विस्कळीत झाली. देशात कांद्याचा तुटवडा भासू नये म्हणून प्रशासनाने टाळेबंदीचे नियम पाळून बाजार समित्यांचे कामकाज सुरळीत राहील यासाठी प्रयत्न केले. प्रारंभीचे दोन, तीन दिवस संभ्रमात गेले. माल पाठवला तरी तो विकला जाईल की नाही, याची भ्रांत होती. वाहतुकीवरील र्निबधामुळे व्यापाऱ्यांनी हात आखडता घेतला होता. जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समाविष्ट कांद्यासह कृषिमालाचे लिलाव थांबणे शेतकऱ्यांसह ग्राहकांना परवडणारे नव्हते. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने बाजार समित्यांशी चर्चा करून कांद्यासह कृषिमालाचे लिलाव सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. यामुळे १७ पैकी ११ ते १२ बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरू झाले. पण सहा बाजार समित्यांमध्ये लिलाव पूर्ववत झाले नाहीत. गर्दीमुळे जिथे लिलाव सुरू होते, तिथेही अडचणी उद्भवतात. मालेगावमध्ये करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र बनला. मनमाड आणि नामपूर बाजारात व्यापाऱ्यांनी पत्र देऊन लिलाव बंद ठेवले. करोनाच्या रुग्णामुळे चांदवड परिसर प्रतिबंधित झाल्याने लिलाव बंद आहेत. सद्य:स्थितीत लासलगाव, पिंपळगाव, नाशिक, दिंडोरी, कळवण अशा काही निवडक बाजार समितीत लिलाव होत आहेत. पिंपळगाव बाजारात गर्दी होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी व्यापारी वर्गाशी चर्चा करून कांदा लिलाव करावा, भाव निश्चित करावा, असे सुचविण्यात आले.

लासलगाव बाजार समितीत सध्या २५ ते ३० हजार क्विंटल कांदा येत आहे. इतर बाजारांत हे प्रमाण कमी असले तरी जिल्ह्य़ाची एकूण आवक ५० ते ८० हजार क्विंटलच्या आसपास आहे. काही बाजारांत लिलाव बंद आहे. ग्रामस्थांनी गावबंदी करून वाहतूक रोखलेली आहे. या संदर्भात अनेकदा झालेली चर्चा निष्फळ ठरली. टाळेबंदी लागू झाल्यापासून आतापर्यंत २६०० मालमोटारी कांदा घेऊन राज्यासह देशातील वेगवेगळ्या भागांत मार्गस्थ झाल्याचे जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांनी सांगितले. ओमान, कोलंबो आणि आखाती देशात निर्यात करण्यात आली. देशातील अनेक भागात विक्रीवर मर्यादा आल्या आहेत. याचा परिणाम दर घसरण्यात झाला. टाळेबंदीपूर्वी उन्हाळ कांद्याला १२५० ते १३०० रुपये क्विंटल दर मिळत होता. सध्या ते ९०० रुपयांवर आले आहे. संपुष्टात येण्याच्या मार्गावर असलेल्या लाल कांद्याला अवघे ७०० ते ८०० रुपये मिळतात. कृषिमाल विक्री व्यवस्था कोलमडल्याने सर्वच शेतमालाची निर्यात, विक्री प्रभावित झालेली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत असणाऱ्या कांद्यासाठी कृषी विभाग, नाफेड, पणन मंडळाने स्वतंत्र आराखडा तयार करून देशभरात कांदा विक्री व्यवस्था सुरळीतपणे पार पडेल याचे नियोजन करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली. आवक मर्यादित असूनही भाव कमी राहिले. मे महिन्यात आवक वाढल्यानंतर परिस्थिती आणखी बिकट होईल, याची उत्पादकांना धास्ती आहे.

करोनामुळे मजूर गावी निघून गेले. काढणीसाठी मजूर मिळत नाहीत. वाहनातून त्यांना आणताही येत नाही. दुबईसह आखाती देशात निर्यात सुरू आहे. पण, निर्यात वा देशांतर्गत माल पोहोचविताना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. रस्त्यावर ठिकठिकाणी अडवणूक होते. मे महिन्यात कांद्याची मोठय़ा प्रमाणात आवक होईल. पावसाच्या सावटामुळे माल कुठे ठेवणार, असा प्रश्न तेव्हा शेतकऱ्यांना भेडसावतो. यामुळे टाळेबंदी संपुष्टात आली तरी प्रचंड आवक होऊन दर आणखी कमी होतील.

– चांगदेवराव होळकर, माजी उपाध्यक्ष, नाफेड