अनिकेत साठे

उन्हाळ कांदा दीर्घकाळ टिकत असल्याने उत्पादकांना दोन पैसे अधिक मिळण्याची अपेक्षा असते. किमान उत्पादन खर्चापेक्षा त्यास जादा भाव तरी मिळतो. गेल्या वर्षी विपुल उत्पादन होऊनही मे ते जुलै या कालावधीत क्विंट्लला सरासरी एक हजार ते १३०० रुपयांपर्यंत दर मिळाले होते. या वर्षी करोनाच्या संकटाने कांदा उत्पादकांचे गणित पूर्णत: विस्कटले आहे. निर्बंध शिथिल होऊनही देशांतर्गत मागणीत वाढ झालेली नाही. अनेक देशांत निर्बंधामुळे निर्यात देखील थंडावली आहे. यामुळे मे ते जुलै या कालावधीत सरासरी भाव गत वर्षीच्या तुलनेत ३०० ते ५०० रुपयांनी घसरले आहेत.

करोनाच्या टाळेबंदीचा सर्वाधिक फटका शेतमालास बसला आहे. वितरण, विक्री व्यवस्था ठप्प झाल्यामुळे द्राक्षे फेकून देण्याची वेळ आली होती. नंतर कृषिमालावरील निर्बंध मागे घेतले गेले. मात्र, आजही शेतमालास विविध प्रकारे झळ सोसावी लागत आहे. उन्हाळ कांद्याला चार ते पाच महिने आयुर्मान असते. त्यामुळे चाळीत साठविलेला कांदा उत्पादक बाजारभाव पाहून विक्रीला काढतात. यंदा मागणीअभावी तसे करताच आले नाही. उलट पावसामुळे साठवलेला कांदा सडण्याची शक्यता बळावल्याने खराब होण्याआधी तो विक्रीला नेण्याकडे अनेकांचा कल आहे. यामुळे जिल्ह्य़ातील मनमाडसह अन्य बाजार समित्यांमध्ये त्याची आवक वाढली आहे.

कांद्याच्या सर्वात मोठय़ा लासलगाव बाजारात जुलै महिन्यात आतापर्यंत ९३ हजार क्विंट्लची आवक झाली. त्यास सरासरी ७५४ रुपये दर मिळाले. तत्पूर्वी म्हणजे जूनमध्ये तीन लाख ८९ हजार क्विंट्लची आवक होती. तेव्हा ८०६ रुपये सरासरी भाव होते. मे महिन्यात अडीच लाख क्विंट्लची आवक होऊन त्यास सरासरी ७०९ रुपये दर मिळाले. मेच्या तुलनेत जूनमध्ये क्विंट्लला सुमारे १०० रुपयांनी उंचावलेले दर जुलैमध्ये पुन्हा ५० रुपयांनी खाली आले. त्याची मागील वर्षांशी तुलना केल्यास मे ते जुलै २०१९ या कालावधीत प्रति क्विंट्लचे सरासरी दर १००३, १२२१ आणि १२४४ इतके होते.

सरकारी यंत्रणांनी कांद्याचा उत्पादन खर्च प्रति क्विंट्लला जवळपास एक हजार रुपये गृहीत धरला आहे. उन्हाळ कांद्याचा हंगाम सुरू होऊन तीन महिने उलटले, मात्र तितका भाव मिळालेला नाही. अत्यल्प भावामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. करोनामुळे अनेक देशांत टाळेबंदी आहे. यामुळे निर्यातीत अडचणी येत असून कांद्याची निर्यात ५० टक्क्य़ांनी कमी झाल्याचे निर्यातदार सांगतात. देशांतर्गत बाजारात नेहमीच्या तुलनेत मागणी ओसरलेली आहे. बाजारभाव घसरल्याने उत्पादकांची आर्थिक कोंडी झाल्याचे चित्र आहे.

यंदा कांद्याचे उत्पादन वाढले असूनही या काळात जेवढी निर्यात होते, त्यात ५० टक्क्य़ांनी घट झाली आहे. सध्या बांगलादेशला कांदा पाठविला जातो. पण श्रीलंका, दुबईसह अन्य देशांत करोनाच्या निर्बंधामुळे निर्यात बंद आहे. देशांतर्गत बाजारात मागणी कमी आणि पुरवठा अधिक असल्यामुळे सध्याची स्थिती निर्माण झाली. निर्यात पूर्ण क्षमतेने सुरू होत नाही, तोपर्यंत स्थानिक बाजारातील स्थिती बदलणार नाही.

– सुवर्णा जगताप (सभापती, लासलगाव बाजार समिती)

मार्चपर्यंत भारतातून निर्यात बंद होती. निर्यातबंदीच्या काळात पाकिस्तानसह अन्य काही देशांनी भारतीय कांद्याची परदेशी बाजारपेठ काबीज केली. करोनाच्या टाळेबंदीत अनेक देशात निर्बंध आहेत. कांद्याची मागणी मोठय़ा प्रमाणात कमी झाली आहे. याचा निर्यातीस फटका बसला. युरोपीय देशात निर्यात बंद आहे. भारतीय कांद्याचे दर स्पर्धात्मक पातळीवर टिकत नाहीत. केंद्र सरकारने निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान दिले होते. तेही बंद करण्यात आले असून निर्यातीला सरकारचे सहकार्य मिळत नाही.

– दानिश शहा (कांदा निर्यातदार)