मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज भूमिपूजन; तज्ज्ञांच्या मते हा आतबट्टय़ाचा व्यवहार

लासलगाव खरेदी-विक्री संघ आणि भारतीय रेल्वे यांच्या पुढाकाराने उभारण्यात येत असलेल्या बहुउद्देशीय शीतगृहात कांद्याचीही साठवणूक करण्यात येणार आहे. खास कांद्यासाठी लासलगावात उभारण्यात येणार असलेल्या या शीतगृहाचे भूमिपूजन आज, रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत होत आहे. मात्र, शीतगृहात कांद्याची साठवणूक करणे अवघड असल्याचा सूर या क्षेत्रातील संशोधक व जाणकारांमध्ये उमटत आहे. कांद्यासाठी शीतगृह म्हणजे आतबट्टय़ाचा व्यवहार असल्याचे समीकरणही तज्ज्ञ मांडत आहेत.

कृषिमालास किफायतशीर दर मिळावे, या उद्देशाने उभारण्यात येणारे राज्यातील हे पहिलेच शीतगृह आहे. देशातील सर्वाधिक मोठी कांदा बाजारपेठ अशी लासलगावची ओळख आहे. काढणीनंतर कृषिमालाचा टिकाऊपणा वाढविण्यासाठी रेल्वेतर्फे देशात शीतगृहांची साखळी उभारली जात आहे. रेल्वेशी संलग्न महामंडळ या प्रकल्पासाठी सामाजिक दायित्व निधीतून पाच कोटी रुपये देणार आहे. शीतगृहात कांदा साठविण्याचे आजवर अनेक प्रयोग झाले. परंतु, ते यशस्वी झाले नसल्याचे नाफेडचे माजी उपाध्यक्ष चांगदेवराव होळकर यांनी सांगितले. जगात कुठेही शीतगृहात कांदा साठविला जात नाही. कारण, शीतगृहातून तो काढल्यावर त्वरित खाण्यासाठी वापरणे गरजेचे असते. तसे न झाल्यास कांदा खराब होण्यास सुरुवात होते. म्हणजे त्याला तातडीने बाजारपेठ उपलब्ध होणे आवश्यक ठरते. त्यातही शीतगृहाचा खर्च शेतकऱ्याला परवडणारा नाही. बटाटा साठवणुकीसाठी महिन्याकाठी ५० पैसे प्रति किलो दर आकारला जातो. तोच दर कांद्यासाठी गृहीत धरल्यास क्विंटलला ५० रुपये लागतील. त्यासाठीच्या पॅकिंग, मजुरी व वाहतूक आदी खर्चाची गोळाबेरीज केल्यास क्विंटलला जवळपास १०० ते १५० रुपये खर्च होतो. चार ते पाच महिने कांदा साठवल्यास शीतगृहाचा खर्च क्विंटलला ५०० ते ६०० रुपयांच्या घरात जाईल. त्यातून शेतकऱ्याला कितपत लाभ होईल, असा प्रश्न होळकर यांनी व्यक्त केला.

शीतगृहात कांद्याची साठवणूक खर्चीक व जोखमीची असल्याचे राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठानचे माजी संचालक डॉ. सतीश भोंडे यांनी मान्य केले.

शीतगृहात तापमान चार अंशापेक्षा कमी असते. बाहेर काढल्यावर त्याला लगेच कोंब फुटतात. यामुळे बाजारपेठेपर्यंत नेण्यासाठीही वातानुकूलन यंत्रणेची व्यवस्था करावी लागेल. शीतगृहात ठेवल्या जाणाऱ्या कांद्याला कोंब फुटू नयेत म्हणून विकिरण प्रक्रिया करता येईल. पण, ही बाब खर्चात भर पाडणारी. यामुळे आवश्यक ती दक्षता घेऊन कांदा चाळीत साठविणे हा सर्वोत्तम उपाय असल्याचे उभयतांनी नमूद केले. चाळीत साठविला जाणारा कांदा सर्वसाधारण वातावरणात असतो. तिथे हवा खेळती राहते.

साठवणुकीचा कालावधी वाढला की, वजनात काहीअंशी घट होते. पावसाळ्यात चाळीला बारदानांचे आच्छादन लावून काळजी घेता येते. बाजारात माल नेल्यावर तो शीतगृहाप्रमाणे लगेच खराब होण्याचा धोका नसतो, याकडे होळकर यांनी लक्ष वेधले

  • साडेतीन एकर जागेत अडीच हजार मेट्रिक टन क्षमतेच्या शीतगृहाची उभारणी
  • त्यात दीड हजार मेट्रिक टन कांदा तर एक हजार मेट्रिक टन फळे व भाजीपाला साठविता येणे शक्य
  • या व्यवस्थेमुळे कृषिमाल निर्यातीला चालना मिळणार असल्याचा खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष नानासाहेब पाटील यांचा दावा