वसुलीसाठी वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय

महावितरणच्या नाशिक परिमंडळात १३ लाख १८ हजारपेक्षा अधिक ग्राहकांकडे तब्बल चार हजार कोटी रुपयांची वीज देयक थकीत आहेत. थकबाकी वसुलीसाठी संबंधित ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र करण्यात येत असून ग्राहकांनी थकबाकी भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले आहे.

महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत शंभर टक्के थकबाकी वसूल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. थकबाकी वसुलीत कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. या पाश्र्वभूमीवर नाशिक शहर व मालेगाव मंडळ कार्यालयांनी थकबाकी मोहीम अधिक तीव्रपणे राबविण्याची मोहिम हाती घेतली आहे.

महावितरणने इतर ग्राहकांसोबतच पथदिवे व पाणीपुरवठा योजनांच्या ग्राहकांना थकबाकी भरण्याबाबत नियमानुसार वेळोवेळी नोटिसा दिल्या आहेत. मात्र संबंधित ग्राहक व यंत्रणांनी या नोटिसांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे नाइलाजास्तव थकबाकी वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करावा लागत आहे.

वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळण्यासाठी थकीत वीज देयकांचा त्वरित भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य अभियंता कुमठेकर यांनी केले आहे. नाशिक परिमंडळात १३ लाख १८ हजार ८४० वीज ग्राहकांकडे तीन हजार ९५८ कोटी रुपये थकीत आहेत.

त्यात नाशिक शहर मंडळातील चार लाख २४ हजार ४४६ ग्राहकांकडे ७१८ कोटी २५ लाख, मालेगाव मंडळातील दोन लाख ५७ हजार ३०० ग्राहकांकडे ६८७ कोटी २९ लाख आणि अहमदनगर मंडळातील सहा लाख ३७ हजार ९४ ग्राहकांकडे दोन हजार ५५२ कोटी ८९ लाख रुपये थकीत आहेत.

नाशिक परिमंडळातील वर्गनिहाय थकबाकी (कंसात ग्राहकांची संख्या) – नाशिक परिमंडळात घरगुती ग्राहकांकडे ७८ कोटी ४१ लाख (५५८६६८), वाणिज्यिक ग्राहकांकडे २७ कोटी २७ लाख (६४५७२), औद्योगिक ग्राहकांकडे १० कोटी ९९ लाख (९९९०), शेतीपंप ग्राहकांकडे ३ हजार ५४४ कोटी ७४ लाख (६६२०२७), पथदिव्यांची २१६ कोटी २३ लाख (७१३६), पाणी पुरवठा योजनांची ५८ कोटी ९२ लाख (३१५५) आणि इतर ग्राहकांकडे २१ कोटी ८९ लाख (१३२९२) रुपयांची वीजबिले थकीत आहेत. तसेच, नाशिक शहर मंडळातील वर्गवारी निहाय थकबाकी (कंसात ग्राहकांची संख्या) – नाशिक मंडळात नाशिक शहर एक आणि दोन, नाशिक ग्रामीण व चांदवड विभागांचा समावेश होतो. यात घरगुती ग्राहकांकडे २३ कोटी ७४ लाख (२१९८१०), वाणिज्यिक ग्राहकांकडे १२ कोटी नऊ लाख (३००९२), औद्योगिक ग्राहकांकडे चार कोटी ४५ लाख (३२०६), शेतीपंप ग्राहकांकडे ६०७ कोटी १३ लाख (१६५१४३), पथदिव्यांची ५७ कोटी ९० लाख (२२७२), पाणी पुरवठा योजनांची १० कोटी ७२ लाख (१००६) आणि इतर ग्राहकांकडे दोन कोटी २२ लाख (२९१७) रुपयांची वीज देयके थकीत आहेत.

मालेगाव मंडळातील वर्गवारीनिहाय थकबाकी (कंसात ग्राहकांची संख्या) – मालेगाव मंडळात मालेगाव, मनमाड, कळवण आणि सटाणा विभागांचा समावेश होतो. यात घरगुती ग्राहकांकडे २० कोटी ५९ लाख (९७१४८), वाणिज्यिक ग्राहकांकडे चार कोटी ५१ लाख (९१२४), औद्योगिक ग्राहकांकडे दोन कोटी ९५ लाख (१७२१), शेतीपंप ग्राहकांकडे ६०६ कोटी ८० लाख (१४०१५३), पथदिव्यांची २४ कोटी ९६ लाख (१३६५), पाणीपुरवठा योजनांची १० कोटी ७१ लाख (५४१) आणि इतर ग्राहकांकडे १६ कोटी ७७ लाख (७२४८) रुपयांची वीज देयके थकीत आहेत.