महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने शुक्रवारी प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी कार्यालयीन वेळ संपल्यानंतरही एक तास जादा काम करून आंदोलन करण्यात आले.

महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनाने तत्त्वत: मान्य केल्या आहेत. परंतु पाच वर्षांपासून जास्त कालावधी लोटूनही अद्याप त्यांची पूर्तता झालेली नाही. शासन याबाबत निर्णय घेत नसल्याने महसूल कर्मचारी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. आपल्या आंदोलनाचा नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी प्रत्येक विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयात जनतेला आवाहन करणारे फलक लावण्यात आले आहे.

तीन टप्प्यांत आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात दुपारच्या जेवणाच्या सुटीत निदर्शने करण्यात आली. त्यानंतर घंटानाद करण्यात आला. शुक्रवारी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने एक तास जास्तीचे काम करत निदर्शने करण्यात आली. यानंतरही शासनाने दुर्लक्ष केल्यास १६ ऑगस्टपासून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. लेखणी बंद आंदोलनाला १६ ऑगस्टपासून सुरुवात होईल. २१ रोजी सामुदायिक रजा आंदोलन तसेच २८ रोजी लाक्षणिक संप होईल. शासनाने निर्णय न घेतल्यास ५ सप्टेंबरपासून बेमुदत संपास सुरुवात करण्यात येईल, असे संघटनेचे राज्य सरचिटणीस नरेंद्र जगताप यांनी सांगितले.

राज्य महसूल कर्मचाऱ्यांच्या वतीने जादा काम आंदोलनात कार्यालयीन वेळ संपल्यानंतरही कार्यालयात एक तास जादा काम करुन प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले.