नाशिक : करोना संकटाच्या पाश्र्वभूमीवर निर्माण झालेल्या प्राणवायू टंचाईवर मार्ग काढण्यासाठी जिल्ह्यतील सर्व सरकारी रुग्णालयांत कायमस्वरूपी प्राणवायूची व्यवस्था होण्यासाठी पहिल्या टप्प्यात नऊ रुग्णालयांमध्ये प्राणवायू निर्मिती प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानंतर आता उर्वरित सर्व शासकीय रुग्णालयांत असे प्रकल्प उभारण्याची सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना के ली आहे.
गेल्या आठवडय़ात पहिल्या टप्प्यातील नऊ रुग्णालयांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून १० कोटी ८८ लक्ष रुपयांना या अत्यावश्यक प्रकल्पासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून चार ठिकाणी आणि भारत प्रतिभुती मुद्रणालयाच्या सामाजिक दायित्व निधीमधून दोन ठिकाणी प्रकल्प सुरु होणार आहेत. यानंतर आता जिल्ह्यतील उर्वरित १६ रुग्णालयांत देखील लवकरच स्वत:चा प्राणवायू प्रकल्प निर्माण होऊन जिल्ह्यतील सर्व ३१ शासकीय रुग्णालयातील प्राणवायू पुरवठय़ाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे.
करोनाच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यतील प्रत्येक तालुक्यातील शासकीय रुग्णालयात कायमस्वरूपी प्राणवायूसज्ज खाटांची व्यवस्था करण्याच्या सूचना पालकमंत्री भुजबळ यांनी जिल्हा प्रशासनाला के ल्या होत्या. जिल्ह्यत पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्हा रुग्णालयासोबत मनमाड, येवला, कळवण आणि चांदवड या उपजिल्हा रुग्णालयात तसेच सिन्नर, पिंपळगाव बसवंत, इगतपुरी आणि वणी या ग्रामीण रुग्णालयात प्राणवायू निर्मिती प्रकल्पाची निर्मिती करण्यात येणार आहे. या प्रस्तावास जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळाली असून करोनाच्या पाश्र्वभूमीवर महिन्याभरात हे प्रकल्प कार्यान्वित होणार आहेत. केंद्र सरकारकडून नांदगाव, दाभाडी, पेठ, सुरगाणा या चार ठिकाणी आणि भारत प्रतिभुती मुद्रणालयाच्या निधीतून दोडी आणि त्र्यंबकेश्वर येथे प्रकल्पाचे काम सुरू होईल.
जिल्ह्यतील उर्वरित अभोणा, दिंडोरी, बाऱ्हे, घोटी, हरसूल, गिरणारे, निफाड, लासलगाव, नगरसूल, उमराणे, देवळा, सटाणा, नामपूर, डांगसौंदाणे तसेच मालेगावमधील महिला रुग्णालय आणि साधारण रुग्णालयात जिल्हा वार्षिक योजनेतून काम करण्यात येणार आहे.