हजारो चाकरमान्यांची भिस्त असणाऱ्या मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसला पाणी टंचाईची झळ बसत असताना दुरांतो एक्स्प्रेसला मार्ग खुला करून देण्याच्या रेल्वे अधिकाऱ्यांच्या नेहमीच्या कार्यशैलीमुळे या गाडीची रडकथा अद्याप कायम आहे. गुरुवारी त्याची पुनरावृत्ती झाल्यामुळे संतप्त प्रवाशांनी वारंवार साखळी खेचून संतप्त भावना व्यक्त केली. या गदारोळामुळे पंचवटी नियोजित वेळेच्या २० मिनिटे विलंबाने मुंबईत पोहोचली. चाकरमान्यांसाठी धावणाऱ्या ‘इंटरसिटी एक्स्प्रेस’ नियोजित वेळेत मार्गक्रमण करणे बंधनकारक आहे. असे असताना अधिकारी दुरांतो व इतर लांब पल्ल्याच्या गाडय़ांना पुढे मार्गस्थ करत पंचवटी एक्स्प्रेसवर अन्याय करत असल्याची तक्रार रेल परिषदेने केली.
जवळपास दोन महिन्यांपासून दुष्काळाची झळ पंचवटीसह गोदावरी व अन्य काही रेल्वेगाडय़ांनाही बसत आहे. उपरोक्त रेल्वे गाडय़ांमध्ये मनमाड रेल्वे जंक्शनवर पाणी भरले जात होते. पण, मनमाडला तीव्र टंचाईला तोंड द्यावे असल्यामुळे पंचवटी, गोदावरी व अन्य काही रेल्वे गाडय़ांसाठी नाशिकरोड स्थानकावर पाणी भरले जाते. त्यामुळे दररोज २० ते २५ मिनिटे खर्ची पडतात. ही तफावत भरून काढण्यासाठी पंचवटी एक्स्प्रेसला मनमाडहून लवकर मार्गस्थ करावे यासाठी प्रवासी पाठपुरावा करत आहे. या स्थितीत गुरुवारी सकाळी पंचवटी एक्स्प्रेस ओढा स्थानकावर काही मिनिटे थांबवून ठेवली गेली. याचवेळी दुरांतो एक्स्प्रेसला पुढे मार्गस्थ करण्यात आले. नाशिकरोड स्थानकावर पंचवटीची प्रतिक्षा करणाऱ्यांना ही बाब लक्षात आल्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. नाशिकरोड स्थानकावर पंचवटी आल्यानंतर पाणी भरण्यात पुन्हा काही वेळ गेला. या एकंदर स्थितीमुळे पंचवटीला अध्र्या तासाहून अधिक काळ विलंब झाल्यामुळे प्रवाशांनी प्रशासनाच्या कार्यशैलीचा निषेध केला. पंचवटी मार्गस्थ झाल्यावर काहींनी साखळी खेचून गाडी थांबविली. या गोंधळामुळे गाडीला आणखी विलंब होऊन ती मुंबईत ११ वाजून ०५ मिनिटांनी पोहोचली. प्रवासात या गाडीने बराच विलंब भरून काढला असला तरी २० मिनिटे उशिरा मुंबईत पोहोचल्याचे रेल परिषदेचे अध्यक्ष बिपीन गांधी यांनी सांगितले.मुंबईत शासकीय आणि खासगी संस्थेत नोकरी करणारे, तसेच व्यावसायिक असे हजारो प्रवासी दररोज पंचवटी एक्स्प्रेसने प्रवास करतात.

‘डेक्कन वेळेत; पंचवटीला सापत्न वागणूक का’
सात वर्षांपूर्वी पंचवटी एक्स्प्रेसला सवरेत्कृष्ट इंटरसिटी एक्स्प्रेस पुरस्कारने गौरविण्यात आले होते. २२ डबे असणारी ही देशातील एकमेव इंटरसिटी एक्स्प्रेस आहे. रेल्वे मंडळाच्या नियमानुसार इंटरसिटी एक्स्प्रेसला नियोजित वेळेत पोहोचविणे बंधनकारक आहे. परंतु, रेल्वेचे स्थानिक अधिकारी या नियमाकडे डोळेझाक करून अन्याय करत असल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली. लेखी स्वरूपात ही बाब निदर्शनास आणूनही प्रशासन दुर्लक्ष करते. नाशिकच्या खासदारांनी दबाव टाकून ही बाब रेल्वे मुख्यालयाच्या निदर्शनास आणून देण्याची गरज असल्याचे गांधी यांनी सांगितले. मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या डेक्कन एक्स्प्रेसला कधीही असा विलंब होत नाही. मग, पंचवटीला सापत्नभावाची वागणूक का दिली जाते, असा प्रश्न प्रवाशांनी केला आहे.