News Flash

पर्वणीतील पायपीट कमी होणार शहर बससेवा अंशत: कार्यान्वित

’भाविकांची पायपीट आता केवळ एक ते दोन किलोमीटरच.

| September 4, 2015 12:03 am

पहिल्या शाही पर्वणीच्या नियोजनात झालेल्या त्रुटींवरून टीका झाल्यानंतर आता पुढील पर्वण्यांमध्ये भाविकांना केवळ एक ते दोन किलोमीटर पायी चालून स्नानासाठी कोणत्याही घाटावर जाता येईल यादृष्टीने फेरबदल करण्यात आले आहेत. पर्वणीच्या दिवशी बहुतांश भागात शहर बससेवा सुरू राहील. त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी वेगवेगळ्या भागातून बसगाडय़ांची व्यवस्था असेल. या व्यतिरिक्त शहरवासीयांना दुचाकी वाहने घेऊन वाहनविरहित क्षेत्राबाहेर भ्रमंती करण्याची मुभा राहणार आहे. पर्वणी काळात सर्व हॉटेल व खाद्यपदार्थाची दुकाने खुली राखली जातील. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सुरक्षिततेच्यादृष्टीने अत्यावश्यक असणाऱ्या लोखंडी जाळ्यांचा शहरवासीयांना त्रास होणार नाही याची दक्षता बाळगली जाणार असल्याचे नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.गुरुवारी दुपारी शासकीय विश्रामगृहात जिल्हास्तरीय कुंभमेळा समितीच्या बैठकीत पहिल्या पर्वणीतील एकंदर नियोजनावर प्रदीर्घ काळ चर्चा झाली. यावेळी सहकार राज्यमंत्री दादा भुसे, खा. हेमंत गोडसे व हरिश्चंद्र चव्हाण, सर्वपक्षीय आमदार, लोकप्रतिनिधी व पदाधिकारी मोठय़ा संख्येने
उपस्थित होते.

महसूल आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी पहिल्या पर्वणीच्या दिवशी भाविक व शहरवासीयांना आलेल्या विचित्र अनुभवांचा अक्षरश: पाऊस पाडला. पुण्याकडून आलेल्या भाविकांना १५ किलोमीटर अंतर पायी चालावे लागले. इतर भागातून आलेल्या भाविकांची वेगळी अवस्था नव्हती. कमालीची पायपीट करावी लागली असताना पोलिसांनी सर्व हॉटेल बंद केल्यामुळे त्यांना खाद्यपदार्थ उपलब्ध झाले नाहीत. सर्वत्र लोखंडी जाळ्या बसविल्याने नाशिककरांना तुरुंगात बसविल्यासारखी स्थिती झाली. त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या बसगाडय़ांमधून दोन ते तीन किलोमीटरसाठी ३० रुपये भाडे आकारून भाविकांची लूट झाली. आमदारांची मोटार रोखून धरण्यात आली.
अतिरेकी पोलीस बंदोबस्तामुळे सर्वाच्या
मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही भीती दूर करून पुढील पर्वणी भाविक व शहरवासीयांना सुसह्य होईल, असे बदल करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. भाविकांना मोफत बससेवा देण्याची मागणी झाली.या सर्वाचा विचार करून आवश्यक ते फेरबदल करण्याचे निर्णय बैठकीत घेण्यात आले. पुढील पर्वणीला पहिल्या पर्वणीच्या तुलनेत चार ते पाच पट अधिक भाविक येणार आहेत. त्यादृष्टीने फेरबदल करताना त्यांची पायपीट होणार नाही, याकडे प्राधान्याने लक्ष दिले जाईल. त्यासाठी शहरात जवळपास १०० बसेस चालविल्या जातील.भाविकांना दसक घाटावर जाण्यासाठी बसगाडय़ांची व्यवस्था असेल. तसेच रामकुंड व परिसरातील घाटांवर गर्दी नसल्यास भाविकांना महामार्ग बसस्थानकावर आणण्याची व्यवस्था केली जाईल. धुळे मार्गाने येणाऱ्या भाविकांना रामकुंड व सभोवतालच्या परिसरात गर्दी नसल्यास बसने डोंगरे वसतिगृह मैदानापर्यंत आणले जाईल. वेगवेगळ्या भागातून येणाऱ्या भाविकांना कोणत्याही घाटावर जाण्यासाठी एक ते दोन किलोमीटरहून अधिक अंतर पायी चालावे लागणार नाही, असे महाजन यांनी नमूद केले. आलेल्या भाविकांना वाहनतळावर जाण्यासाठी बससेवा सुरू असल्याने बसगाडय़ा उपलब्ध राहतील. कमी अंतराच्या प्रवासासाठी १०, २० व ३० रुपये अशी वेगवेगळी तिकीट आकारणी केली जावी, असे निर्देशही महाजन यांनी दिले. अधिकाधिक भाविकांना रामकुंड, टाळकुटेश्वर व लक्ष्मीनारायण घाटावर स्नानाची संधी देण्याचाही नियोजनात समावेश करण्यात आला.या काळात शहरातील दैनंदिन व्यवहार सुरळीत राहतील. दूध, भाजीपाला, वृत्तपत्र व अन्य जीवनावश्यक वस्तूंचा सुरळीत पुरवठा होईल, याकडे लक्ष देण्याची सूचना भुसे यांनी केली. दुसऱ्या व तिसऱ्या पर्वणीत भाविक व नागरिकांना उत्स्फूर्तपणे व सहजतेने उत्सवाचा आनंद लुटता येईल, असे महाजन यांनी सांगितले.
ठळक फेरबदल
’भाविकांची पायपीट आता केवळ एक ते दोन किलोमीटरच.
’भाविकांसाठी टाळकुटेश्वर, लक्ष्मीनारायण व तपोवन घाटांचा स्नानासाठी वापर. गर्दी झाल्यास त्यांना इतर घाटावर नेले जाईल.
’मुंबई व पुण्याहून येणाऱ्या बसेस थेट महामार्ग बसस्थानकात नेल्या जातील. नाशिकरोड व रेल्वे स्थानकाहून येणाऱ्या बसगाडय़ा काठे गल्लीपर्यंत. तिथून भाविकांना लक्ष्मीनारायण घाटापर्यंत पायी पोहोचता येईल.
’धुळे, दिंडोरी व औरंगाबादहून येणाऱ्या भाविकांना क. का. वाघ महाविद्यालयापासून पायी लक्ष्मीनारायण घाटावर जाता येईल.
’लक्ष्मीनारायण घाटावरील भाविकांना पुढे तपोवनकडे नेले जाईल. जर त्यांना रामकुंडावर जायचे असेल तर प्रथम तपोवन येथे जावे लागेल. नंतर रामकुंडावर जाता येईल.
’लक्ष्मीनारायण घाटावर गर्दी वाढल्यास नाशिकरोड व पुण्याहून येणाऱ्या बसगाडय़ा थेट सैलानी बाबा येथे नेण्यात येतील. तिथून दसक घाटावर पायी जावे लागेल.
’सर्व अंतर्गत वाहनतळांवरून त्र्यंबकेश्वर, शिर्डी व निलगिरी बागकडे जाणाऱ्या बसगाडय़ा सोडण्यात येतील.
’नाशिककरांना दुचाकी वाहने उभी करण्यासाठी इदगाह मैदानाची उपलब्धता.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2015 12:03 am

Web Title: parvanit city bus partially implemented foot slog will be reduced
Next Stories
1 नाशिकच्या गुंडास धुळ्यात अटक
2 राज ठाकरेही साधू-महंतांच्या दर्शनार्थ नाशिकमध्ये
3 राज ठाकरेही साधू-महंतांच्या दर्शनार्थ
Just Now!
X