सार्वजनिक ठिकाणी शस्त्रास्त्रे घेऊन मुले, महिलांसह भाविकांच्या मागे धावणे, वाहनांची तोडफोड करणे आणि थेट कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देण्याची जी घटना दोन दिवसांपूर्वी साधुग्राममध्ये घडली, त्याकडे पोलीस यंत्रणेने कानाडोळा करण्याचे धोरण स्वीकारल्याचे अधोरेखीत झाले आहे.
साधारणत: अर्धा ते पाऊण तास साधुंनी तलवारी, लाठय़ा-काठय़ा घेऊन अक्षरश: धुडगूस घालत दंगलसदृश्य वातावरण तयार केले. महत्वाची बाब म्हणजे, शस्त्रास्त्रांचा धाक दाखवत ज्यांची मिरवणूक रोखण्यात आली, त्या विश्वात्मक जंगली महाराज ट्रस्टने (आत्मा मालीक ध्यानपीठ) साधू-महंतांच्या कार्यशैलीचा निषेध करण्यापलीकडे तक्रार देण्याचे धारिष्ठय़ दाखविले नाही. या घडामोडींचा परिणाम भाविकांवर झाला असून एरवी सुटीच्या दिवशी गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या साधुग्राममध्ये रविवारी नेहमीच्या तुलनेत कमी भाविक असल्याचे पहावयास मिळाले.
कुंभमेळा आणि वाद हे समीकरण प्रदीर्घ काळापासून चालत आले आहे. आखाडय़ांमधील अंतर्गत मतभेद, साधू-महंत आणि प्रशासन यांच्यातील वादाचे काही अंक यंदाच्या सिंहस्थातही पार पडले. शनिवारी घडलेली घटना मात्र त्यापेक्षा वेगळी होती. सिंहस्थात शाही मार्गावर परवानगीशिवाय मिरवणूक काढण्यास वैष्णवपंथीय आखाडय़ांची हरकत आहे. हा मुद्दा पुढे करत साधू-महंतांनी पोलिसांनी परवानगी दिलेल्या आत्मा मालीक ध्यानपीठाच्या मिरवणुकीचा मार्ग रोखला. कुंभमेळ्यानिमित्त जंगली महाराज ट्रस्टने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्या पाश्र्वभूमीवर, काढलेल्या मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झाले होते. अग्रभागी स्केटिंग खेळणारे मुले, लेझिम पथक आणि महिला होत्या.ा साधू-महंत शस्त्रास्त्र घेऊन धावून आल्यावर भयभीत झालेली मुले व महिलांची धावपळ उडाली. सजविलेल्या रथांची साधुंनी तोडफोड केली. लोखंडी जाळ्या रस्त्यात आडव्या लावत मार्ग बंद करण्यात आला. या घडामोडींमुळे साधुग्राममध्ये दंगलसदृश्य वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी मध्यस्ती करत मिरवणुकीचा मार्ग बदलून हा वाद शमविला. एव्हाना साधू-महंतांच्या रौद्रावताराने घाबरलेल्या महिला व मुलांनी माघारीचा रस्ता धरला.
शस्त्र घेऊन रस्त्यावर उतरलेल्या शेकडो साधुंसमोर पोलीस यंत्रणाही निष्भ्रम ठरली. पोलिसांदेखत अर्धा ते पाऊण तास हा गोंधळ सुरू होता. पण, कोणावरही कारवाई झाली नाही. या प्रकरणी आत्मा मालीक ध्यानपीठाने तक्रार देण्याचे टाळले. यामुळे गुन्हा देखील दाखल झाला नाही. एरवी, शस्त्रास्त्रे घेऊन कोणी असा धुडगूस घातला तर त्यांच्यावर काय कारवाई केली जाते, हे सर्वज्ञात आहे.
पहिल्या शाही पर्वणीत पोलिसांनी मिरवणुकीवेळी सर्व आखाडय़ांना नियमावली निश्चित करून दिली होती. मात्र, त्यातील अनेक नियम धुडकावत साधू-महंतांनी मनमानी केली. सार्वजनिक ठिकाणी पारंपरिक शस्त्र बाळगण्यास त्यांना मनाई असताना संबंधितांनी ती स्वत:जवळ ठेवत त्यांचा तोडफोडीसाठी वापरही केला.
कुंभात नव्या वादाची भर नको म्हणून पोलीस यंत्रणेने त्याकडे डोळेझाक केल्याचे दिसत आहे.