ग्रामीण पोलिसांकडून २९ लाखांपेक्षा अधिक मुद्देमाल जप्त

विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर अवैध कारवाया आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस सज्ज झाले असून जिल्ह्य़ातील १२ सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. तर २१ जणांविरुध्द कारवाईचे प्रस्ताव आहेत. आतापर्यंत २९ लाखांहून अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मतदान शांततेत पार पडावे यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीत कोणत्याही प्रकारची बाधा येऊ नये म्हणून सराईत गुन्हेगार, समाजकंटक, संशयितांविरुध्द ग्रामीण पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे.

अवैधरीत्या दारू व्यवसाय करून अशांतता पसरविणाऱ्यांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. अवैध मद्यवाहतुकीला आळा बसावा यासाठी तपासणी नाक्यावर व्यवस्था करण्यात आली आहे. त्याअंतर्गत अवैधरीत्या शस्त्र बाळगणाऱ्या चार संशयितांविरुध्द कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून तीन तलवारी, एक चॉपर ताब्यात घेण्यात आला आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनेत वेगवेगळ्या कलमाअंतर्गत १०४३ गुन्हेगारांवर, तर अवैध दारू प्रकरणात २२२ लोकांविरोधात कारवाई करण्यात आली असून २९ लाखांपेक्षा अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये ५२ गुन्हे दाखल असून त्यात ९२ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडील १३ लाख १४ हजार ४१३ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्ह्य़ातील ४० पोलीस ठाण्यांमधून एक हजार ४०८ आदेश बजावण्यात आले. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर न्यायालयाकडून १६ आदेश देण्यात आले. तसेच जिल्हा अभिलेखावरील ५४ पाहिजे असलेल्या आरोपींना अटक करण्यात आली. महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेन्जरस अ‍ॅक्टिव्हिटीअंतर्गत इगतपुरी तालुक्यातील सराईत गुन्हेगार सचिन म्हसणे याविरुध्द कारवाईचा जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.