फ्युनिक्युलर ट्रॉली लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची घोषणा

कळवण : सप्तशृंग गडावरील फ्युनिक्युलर ट्रॉलीमुळे अपंगांसह आबालवृद्धांना सप्तशृंगी देवीचे दर्शन घेणे सुलभ झाले आहे.  भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी शासनाकडे २५ कोटींचा आराखडा सादर झाला आहे. त्यानुसार विकासकामांसाठी प्राधान्यक्रमाने निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.

अनेक वर्षांपासून रेंगाळलेल्या सप्तशृंग गडावरील फ्युनिक्युलर ट्रॉली प्रकल्पाचे सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यानिमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस आणि जामीन मिळाल्यानंतर तुरुंगातून बाहेर आलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे प्रथमच एका व्यासपीठावर आले. भुजबळ यांनी या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घातल्याचा उल्लेख केला; तथापि मुख्यमंत्र्यांनी भुजबळ यांच्याविषयी कोणतेही विधान केले नाही. नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मांजरपाडा पाणी योजनेचा संदर्भ देऊन त्या कार्यक्रमास भुजबळ यांना निमंत्रित करण्याचे आश्वासन दिले.

गडावरील मंदिरापर्यंत जाण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर साकारलेल्या, पण रखडलेल्या लोकार्पण सोहळ्यास अखेर मुहूर्त लाभला. या प्रकल्पाने मुख्यमंत्र्यांना सुखद धक्का बसला. त्यांनी त्याचे कौतुक केले.

प्रारंभी राज्यमंत्री भुसे यांनी सप्तशृंग गड हे ब वर्ग देवस्थान गटात असून या ठिकाणी पायाभूत सुविधांसह विकासकामांसाठी २५ कोटी रुपयांचा आराखडा शासनाकडे सादर करण्यात आल्याचे नमूद केले. भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी निधीची व्यवस्था करावी, अशी मागणी केली. भुजबळ यांनी आपल्या भाषणात या प्रकल्पाचे लोकार्पण केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. या प्रकल्पासाठी आपण पाठपुरावा केला. मुख्यमंत्र्यांना गळ घातली. गडावर जळगावमधील भाविक मोठय़ा प्रमाणात येतात. गडावरील पाणीटंचाईची समस्या सोडवून परिसर सुजलाम सुफलाम करण्यासाठी रखडलेल्या मांजरपाडा प्रकल्पाचे काम मार्गी लावावे, याकडे भुजबळ यांनी लक्ष वेधले. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी त्यावर उत्तर दिले. मांजरपाडा प्रकल्पाचे काम लवकरच मार्गी लागणार असून त्या कार्यक्रमास भुजबळांना निमंत्रित केले जाईल, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमात फ्युनिक्युलर ट्रॉली प्रकल्पाच्या उभारणीत सहभागी झालेले बांधकाम विभागाचे अधिकारी आणि प्रकल्पाचे संचालन करणारा संघ यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सोहळ्यास खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आ. सीमा हिरे, आ. दीपिका चव्हाण आदी लोकप्रतिनिधी उपस्थित होते. गडावरील मजबुतीकरण करण्यात आलेल्या भवानी पाझर तलावाचे लोकार्पणही फडणवीस यांच्या हस्ते झाले.

 

निधीची पूर्तता करणार

अतिशय चांगल्या गुणवत्तेचा हा प्रकल्प आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे सर्वाना सप्तशृंगी आईचे दर्शन घेणे सुलभ होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी भाषणात मांडलेल्या मागण्यांचा संदर्भ घेऊन शासनाकडे २५ कोटींचा आराखडा सादर झाला आहे. त्यानुसार विकासकामांसाठी प्राधान्यक्रमाने निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.

नियोजनातील गोंधळ

गडावर वाहनतळाच्या जागेत लोकार्पण सोहळ्यासाठी मंडप उभारण्यात आला होता. पावसाची शक्यता लक्षात घेऊन ऐन वेळी कार्यक्रम मुख्य सभागृहात पार पडला. या सभागृहात काही ठिकाणी खांब तसेच अडथळे आहेत. यामुळे उपस्थितांना सलग आसनस्थ होणे अवघड झाले. त्यात या सभागृहात ध्वनिक्षेपकाचा आवाज घुमत होता. यामुळे वक्त्यांचे बोलणे ऐकताना उपस्थितांचा कस लागला.