24 October 2020

News Flash

सार्वजनिक सायकल व्यवस्था अखेर सुरू

अनेक महिन्यांपासून स्मार्ट सिटीअंतर्गत रखडलेल्या सार्वजनिक सायकल व्यवस्थेला अखेर घटस्थापनेचा मुहूर्त लाभला.

नाशिक येथे सार्वजनिक सायकल व्यवस्थेच्या लोकार्पणप्रसंगी स्मार्ट सिटी कंपनीचे संचालक विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, सभागृह नेते दिनकर पाटील, गुरूमित बग्गा यांनी कान्हेरे मैदानातून थेट महापालिका मुख्यालयापर्यंत सायकलवर रपेट मारली. पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही सायकलने महापालिका गाठली.

शक्य तिथे सायकल मार्गिका; अन्य रस्त्यांवर रेखांकन

अनेक महिन्यांपासून स्मार्ट सिटीअंतर्गत रखडलेल्या सार्वजनिक सायकल व्यवस्थेला अखेर घटस्थापनेचा मुहूर्त लाभला. स्मार्ट सिटी संचालक, नाशिक सायकलिस्टचे प्रतिनिधी, शहर वाहतूक शाखेचे अधिकारी यांनी सायकलवर भ्रमंती करत सहभाग नोंदविला. इंधनाचे दर गगनाला भिडले असताना विद्यार्थ्यांसह नागरिकांना सायकल व्यवस्थेची प्रतीक्षा होती. गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकल्प रखडला होता.

पहिल्या टप्प्यात १० ठिकाणी २०० सायकल उपलब्ध करून देण्यात आल्या असून दिवाळीपर्यंत १०० ठिकाणी एकूण एक हजार सायकल टप्प्याटप्प्याने उपलब्ध होणार आहेत. तसेच शक्य त्या रस्त्यांवर सायकल मार्गिका आणि अस्तित्वातील रस्त्यांवर सायकल मार्गिकेसाठी रेखांकन करण्यात येणार आहे.

हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सकाळी महापौर रंजना भानसी, आयुक्त तुकाराम मुंढे, उपमहापौर प्रथमेश गिते आदींच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. आयुक्त मुंढे यांच्यासह स्मार्ट सिटी संचालकांनी मैदान ते महापालिकेचे राजीव गांधी भवन हा प्रवास सायकलने करून शहरवासीयांना पर्यावरणस्नेही व्यवस्थेचा लाभ घेण्याचा संदेश दिला. नाशिक महापालिका स्मार्ट सिटी विकास प्राधिकरण आणि महापालिका यांच्यावतीने हेक्सी हिरो सायकलच्या सहकार्याने या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली.

अ‍ॅपधारकांना सुविधा

भाडेतत्त्वावर सायकल व्यवस्थेचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांना प्रथम दी हेक्सी अ‍ॅप आपल्या भ्रमणध्वनीवर डाऊनलोड करावे लागणार आहे. तूर्तास हे अ‍ॅप ज्यांच्याकडे डाऊनलोड असेल, त्यांना सायकल सेवेचा आनंद घेता येईल. अ‍ॅपवर नोंदणीकृत सभासद पहिल्या ३० मिनिटांसाठी कितीही वेळा मोफत सायकल वापरू शकतात. ३० मिनिटांनंतर त्यांना पाच रुपये आकारले जातील. तसेच पे अ‍ॅण्ड राइड योजनेत पाच रुपयात सायकल वापरता येईल.

पहिल्या टप्प्यातील सायकल केंद्र

हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, राजीव गांधी भवन, महात्मानगर क्रिकेट मैदान, मॅरेथॉन चौक, कुसुमाग्रज वाचनालय, गोकुळ पिंगळे वाचनालय, प्रमोद महाजन उद्यान, केटीएचएम महाविद्यालयासमोर, अशोक स्तंभावरील गुरांचा दवाखाना आणि जेहान सर्कल या ठिकाणी १० सायकल केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

नाशिक येथे सार्वजनिक सायकल व्यवस्थेच्या लोकार्पणप्रसंगी स्मार्ट सिटी कंपनीचे संचालक विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, सभागृह नेते दिनकर पाटील, गुरूमित बग्गा यांनी कान्हेरे मैदानातून थेट महापालिका मुख्यालयापर्यंत सायकलवर रपेट मारली. पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही सायकलने महापालिका गाठली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2018 1:54 am

Web Title: public cycle arrangements are finally started
Next Stories
1 विश्वशांती अहिंसा संमेलनाचे राष्ट्रपती उद्घाटक
2 घोटी-सिन्नर महामार्गावरील खड्डय़ात घटस्थापना
3 उपक्रमांनी प्रशासन बेजार
Just Now!
X