प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यातही मातब्बर नेत्यांच्या सभा

राजकीय सभांच्या धडाक्यात आरोप-प्रत्यारोपांनी ढवळून निघालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात अंतिम टप्प्यात शहरात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात रंगणाऱ्या सामन्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. शुक्रवारी सायंकाळी राज यांची सभा ज्या मैदानावर होणार आहे, त्याच ठिकाणी शनिवारी सकाळी मुख्यमंत्र्यांची सभा घेण्याचे नियोजन आहे. राज यांच्या टीकेला तितक्याच ताकतीने आणि त्यांच्याच प्रचारतंत्राने मुख्यमंत्र्यांकडून प्रत्युत्तर देण्याची तयारी महायुतीकडून करण्यात येत आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचे हेमंत गोडसे, महाआघाडीचे समीर भुजबळ, बहुजन विकास आघाडीचे पवन पवार आणि भाजप बंडखोर माणिक कोकाटे यांच्यात चौरंगी लढत होत आहे. माजी आमदारांची बंडखोरी भाजपचे नेते शमवतील अशी सेनेला अपेक्षा होती. परंतु, तसे घडले नाही. कोकाटे यांनी दंड थोपटत प्रचार सुरू केला. याची दखल घेत भाजपने त्यांची हकालपट्टी करीत आपले सर्व लोकप्रतिनिधी, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना प्रचारात जुंपले आहे.

स्थानिक पातळीवर या घडामोडी घडत असताना दुसरीकडे राज्यस्तरावर मनसेचे अध्यक्ष राज हे वेगवेगळे व्हिडीओ सादर करत भाजपच्या नेत्यांवर कठोर शब्दात प्रहार करीत आहेत. मनसेच्या प्रचारतंत्रामुळे धास्तावलेल्या महायुतीने राज यांचा मार्ग अनुसरण्याचे ठरवले आहे. त्याची प्रचीती बुधवारी महायुतीच्या सभेत खुद्द उद्धव ठाकरे यांनी सादर केलेल्या व्हिडीओतून आली. पूर्व नियोजित कार्यक्रमानुसार याच सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार होते. परंतु, याच मैदानावर शुक्रवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणार असल्याने महायुतीने आपली रणनीती बदलली. संयुक्त सभेला उपस्थित न राहता शनिवारी सकाळी मुख्यमंत्र्यांची स्वतंत्र सभा आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

मनसेचे अध्यक्ष राज यांची शुक्रवारी सायंकाळी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर जाहीर सभा होत आहे. सभेची जय्यत तयारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. कधीकाळी नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला होता. शहरात पक्षाचे तीन आमदार आणि महापालिकेत सत्ताही होती. नंतरच्या काळात मनसेला ओहोटी लागली. गेल्या निवडणुकीत लोकसभेच्या रिंगणात मनसेचा उमेदवारही होता. या निवडणुकीत कोणत्याही जागेवर उमेदवार न देता राज हे जाहीर सभांमधून भाजप नेत्यांवर आगपाखड करीत आहेत. भाजप नेत्यांचे वेगवेगळे व्हिडीओ सादर करत ते संबंधितांचे दावे फोल ठरवत आहेत. राज यांच्या प्रचारतंत्राची धास्ती घेऊन भाजपने राज यांना त्यांच्यात प्रचारतंत्राने शनिवारी उत्तर देण्याचे जाहीर केले आहे. राज यांची सभा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी सायंकाळी जाहीर प्रचाराची मुदत संपणार आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांची सभा सकाळी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर घेण्याचे नियोजन सुरू आहे. राज यांच्या आरोपांना त्याच धाटणीने मुख्यमंत्री सडेतोड उत्तर देतील, अशी भाजप कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात शुक्रवारी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची यशवंतराव महाराज पटांगणावर सभा होईल.