सध्या ३२८० रुग्णांवर उपचार

नाशिक : मालेगावनंतर नाशिक शहरात करोनाचा कहर सुरू असताना आता ग्रामीण भागातही अनेक तालुक्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. ग्रामीण भागात सद्य:स्थितीत ३२८० रुग्ण उपचार घेत असून यामध्ये सिन्नर, निफाड, नाशिक आणि मालेगाव तालुक्यांत सर्वाधिक रुग्ण आहेत. प्रारंभी करोनाच्या प्रादुर्भावापासून दूर राहिलेल्या आदिवासीबहुल सुरगाणा, पेठ तालुक्यांतही अनुक्रमे २५, २१ रुग्ण उपचार घेत आहेत.

जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ६५ हजारांचा टप्पा ओलांडण्याच्या मार्गावर आहे. रुग्णसंख्या वाढत असली तरी बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढत आहे. उपचारानंतर ५३ हजार २०१ रुग्णांना घरी सोडण्यात आले. सध्या नऊ हजार ६२८ रुग्ण उपचार घेत असून अनेक दिवसांनंतर ही आकडेवारी १० हजारांखाली आली आहे. १३ सप्टेंबरला उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १० हजार ८१८ इतकी होती. आठवडाभरात ११९० रुग्णसंख्या कमी करण्यात यश मिळाले. नव्याने आढळणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले असल्याकडे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी लक्ष वेधले. जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे जवळपास ४४ हजार रुग्ण हे नाशिक शहरात आढळले आहेत. त्यातील ३७ हजार ५२१ रुग्ण बरे झाले. सध्या ५६४८ रुग्ण उपचार घेत आहेत. मालेगावमधील रुग्णसंख्या साडेतीन हजारांचा टप्पा गाठण्याच्या मार्गावर आहे. त्यातील २६६७ रुग्ण बरे झाले . सध्या ६०७ रुग्ण उपचार घेत आहेत. शहरी भागात बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे.

नियमांचे पालन होत नसल्याने विषाणूचा संसर्ग पसरत आहे. दुसरीकडे ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. निफाडमध्ये मालेगावपेक्षा अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार नाशिक तालुक्यात ३७३, चांदवड ११२, सिन्नर ५३६, दिंडोरी १३३, निफाड  ७१३, देवळा ३६,  नांदगांव २९१, येवला ७६, त्र्यंबकेश्वर ४६, सुरगाणा २५, पेठ २१, कळवण ८०,  बागलाण २१६, इगतपुरी ३९९, मालेगांव ग्रामीण २२३ याप्रमाणे एकूण तीन हजार २८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात पाच हजार ६४८, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ६०७  तर जिल्ह्याबाहेरील ९३ असे रुग्ण स्थानिक पातळीवर उपचार घेत आहेत.

जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ५३  हजार २०१ करोनाबाधितांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. करोनामुळे आतापर्यंत एक हजार १७३  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात नाशिक ग्रामीणमधील ३५९, नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ६४२, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १४६ आणि जिल्ह्याबाहेरील २६ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्याची रुग्ण बरे होण्याची टक्केवारी उंचावत आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.१२ टक्के इतके आहे. नाशिक ग्रामीणमध्ये हे प्रमाण ७७.७९, नाशिक शहरात ८५.६४, मालेगावमध्ये ७७.९८  टक्के तर जिल्हाबा रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६९.१७ टक्के असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले. शहरात करोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असताना आरोग्य विभागाला आता ग्रामीण भागातही विशेष लक्ष द्यावे लागणार असल्याची स्थिती आहे.