दहा वर्षांपूर्वीचे  खंडणी प्रकरण

नाशिक : १० कोटींच्या खंडणीसाठी पाथर्डी फाटा परिसरात एका बांधकाम व्यावसायिकाच्या प्रकल्प स्थळावरील कार्यालयात गोळीबार केल्याप्रकरणी अटकेत असलेला कुख्यात गुंड रवी पुजारीची गुरुवारी विशेष मोक्का न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. हे प्रकरण दहा वर्षांपूर्वीचे आहे. गोळीबारात एक कर्मचारी गंभीर जखमी झाला होता. फरार पुजारीला काही दिवसांपूर्वी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले होते.

मागील आठवडय़ात न्यायालयाने पुजारीला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. या कोठडीची मुदत पूर्ण झाल्याने मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने बंदोबस्तात पुजारीला न्यायालयात हजर केले. २४ नोव्हंेबर २०११ रोजी बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात गोळीबार झाला होता. वडाळा-पाथर्डी रस्त्यावर एका गृह प्रकल्पाचे काम सुरू होते. गुंड पुजारीने बांधकाम व्यावसायिकाकडे १० कोटींची खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्यास मारण्याची धमकी दिली. गोळीबारात बांधकाम व्यावसायिकाचा कर्मचारी जखमी झाला होता. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला. तपास यंत्रणेने चार जणांना अटक केली. रवी पुजारीसह तिघे फरार  होते. ज्या चार संशयितांना अटक झाली, त्यातील तिघांना २०१९ मध्ये जन्मठेप तर एकाला पाच वर्षे सक्तमजुरी सुनावण्यात आली आहे.

गुरुवारी विशेष मोक्का न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने पुजारीला १२ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. तपास पथकाने पुजारीच्या आवाजाचा नमुना घेऊन दूरध्वनी संभाषण तपासणीसाठी तज्ज्ञांकडे पाठविले आहे. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी युक्तिवाद केला. पुजारीला सेनेगलमधून प्रत्यार्पण प्रक्रियेद्वारे भारतात आणण्यात आले आहे. या प्रक्रियेत काही अटी असतात. त्याच्याविरुद्ध मुंबई, ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यातील काही प्रकरणांत न्यायालयीन सुनावणीला जाण्यास तो तयार आहे. याबाबतची माहिती अ‍ॅड. मिसर यांनी दिली. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुजारीची जिल्हा रुग्णालयात करोना चाचणी करण्यात आली. नंतर बंदोबस्तात त्याला मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात रवाना करण्यात आले.