01 June 2020

News Flash

रस्त्यांवर ८६४१ खड्डे ?

मुसळधार पावसामुळे शहरातील बहुतांश रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे.

शहर खड्डेमुक्त करण्याची सूचना

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आणि राष्ट्रपतींच्या दौऱ्याप्रसंगी काही विशिष्ट मार्गावरील खड्डे बुजविले गेले होते. आता महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना शहरातील उर्वरित रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची गरज लक्षात आली आहे. सध्या शहरातील रस्त्यांवर थोडे थोडके नव्हे, तर तब्बल आठ हजार ६४१ खड्डे आहेत. नवीन नाशिकमध्ये त्याचे प्रमाण सर्वाधिक, तर नाशिक पूर्वमध्ये सर्वात कमी आहे. वाहनधारकांचे कंबरडे मोडणारे सर्व खड्डे बुजवून ३० नोव्हेंबपर्यंत शहर खड्डेमुक्त करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे.

मुसळधार पावसामुळे शहरातील बहुतांश रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. अनेक रस्त्यांवर लहान-मोठे खड्डे पडले असून मार्गक्रमण करताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. खड्डेमय रस्त्यांमुळे पाठीचे, मणक्यांचे विकार बळावले. खड्डे लहान-मोठय़ा अपघातांना निमंत्रण देतात. अतिविशिष्ट व्यक्तींच्या दौऱ्यावेळी पालिकेने काही रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी आपली यंत्रणा कामाला लावली होती. संबंधित व्यक्ती ज्या मार्गाने मार्गस्थ होणार आहे, त्या रस्त्यांचे डांबरीकरण, खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर पार पडले होते. उर्वरित रस्त्यांना मात्र ते भाग्य लाभले नाही.

खड्डेमय रस्त्यांवरून तक्रारी वाढल्यानंतर स्थायी सभापती उद्धव निमसे यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची प्रभागनिहाय बैठक घेतली. या वेळी प्रभागनिहाय असणारे खड्डे, बुजविण्यात आलेले खड्डे याची सविस्तर माहिती जाणून घेतली. रस्त्याची कडा, रस्ता दुभाजक यांची स्वच्छता करण्याची सूचना करण्यात आली. प्रभागनिहाय पाहणी करून पुन्हा खड्डे बुजविले जातील याकडे लक्ष द्यावे. त्याचा अहवाल सादर करावा, असे सूचित करण्यात आले. बुधवारपासून रस्त्यांच्या कडा भरणे, तणनाशक फवारणी, स्वच्छता करावी.

१० नोव्हेंबर नंतर रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले जाईल. ३० नोव्हेंबपर्यंत शहर खड्डेमुक्त करावे. त्यात कसूर झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यावर राहणार असल्याचे निमसे यांनी सूचित केले.

पावसाळ्यात खड्डे बुजविण्यासाठी ‘कोल्डमिक्स डांबर’ वापरण्याचे नियोजन करण्यास सांगण्यात आले आहे. ज्या भागातील रस्ते १० ते १२ वर्षांचे झाले आहेत, त्यांच्या अस्तरीकरणाचे प्रस्ताव तयार करून नव्या अर्थसंकल्पात समाविष्ट होतील, याबाबत दक्षता घेण्याची सूचना करण्यात आली. बैठकीस नगरसेविका कल्पना पांडे, नगरसेवक चंद्रकांत खोडे, अतिरिक्त आयुक्त संदीप नलावडे, शहर अभियंता संजय घुगे आदी उपस्थित होते.

महापौरांच्या विभागात २०३५ खड्डे

सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या माहितीनुसार २६ प्रभागात ८६४१ खड्डे असल्याचे म्हटले आहे. प्रभागनिहाय आकडेवारीत प्रभाग क्रमांक आठमध्ये सर्वाधिक ६०० तर सर्वात कमी खड्डे प्रभाग १४ मध्ये आहे. नवीन नाशिकमधील रस्ते खड्डेमय झाल्याचे आकडेवारी सांगते. या विभागात २४६२ खड्डे आहेत. नाशिक पूर्वमध्ये ५०६, नाशिक पश्चिममध्ये ९३०, महापौरांचे वास्तव्य असणाऱ्या पंचवटी विभागात २०३५, नाशिकरोडमध्ये १०८७, सातपूर विभागात १६२१ असे खड्डय़ांचे प्रमाण आहे. यातील १६२१ खड्डे बुजविण्यात आल्याचे पालिकेने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2019 12:30 am

Web Title: roads pits akp 94
Next Stories
1 उदंड झाले पाणी तरीही १६ दिवसांआड नळाद्वारे पुरवठा
2 पिकांच्या नुकसानीच्या पाहणीसाठी राजकारण्यांचे दौरे
3 नाशिक जिल्ह्य़ावर पुन्हा अतिवृष्टीचे सावट
Just Now!
X