१३३ व्यापारी सव्वातीन कोटी रुपये देण्यास तयार; फसवणुकीचे ९७ गुन्हे दाखल

नाशिक : कृषिमाल खरेदी करून शेतकऱ्यांना पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात कारवाईचे सुतोवाच झाल्यानंतर महिनाभरात परिक्षेत्रात शेतकरी फसवणुकीबाबत प्राप्त ५९३ अर्जावर कारवाई करून ९७ गुन्हे दाखल करण्यात आले. त्यातून तब्बल दोन कोटी ७४ हजारहून अधिकची रक्कम शेतकऱ्यांना परत मिळाली आहे. शिवाय १३३ व्यापारी सव्वा तीन कोटींची रक्कम देण्यास तयार झाले. विभागात प्राप्त झालेल्या अर्जात फसवणूक झालेली रक्कम १८ कोटी ६९ लाखहून अधिक आहे. परिक्षेत्रात ३० सुशिक्षित बेरोजगारांचीही सुमारे एक कोटी ७७ लाख रुपयांना फसवणूक झाली असून त्यापैकी ३३ लाख ३३ हजार रुपये परत मिळाले आहेत.

याबाबतची माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. महिनाभरापूर्वी विशेष पोलीस महानिरीक्षक पदाचा पदभार डॉ. दिघावकर यांनी स्वीकारला होता. त्यावेळी अवैध व्यवसाय, गुन्हेगारी, शेतकरी-सुशिक्षित बेरोजगार यांच्या झालेल्या फसवणुकीवर अंकूश ठेवण्यासाठी कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. स्वत:चा भ्रमणध्वनी क्रमांकही डॉ. दिघावकरांनी नागरिकांना उपलब्ध करून दिला होता. त्यास नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. इ मेल, भ्रमणध्वनी, समक्ष भेटून अनेकांनी तक्रारी मांडल्या. परिक्षेत्रातील जिल्ह्यात शेतकरी फसवणूक आणि सुशिक्षित बेरोजगार यांच्या फसवणुकीबाबत मोहीम राबविण्यास सुरूवात केली. तक्रारी सोडविण्यासाठी तात्काळ कारवाईसाठी मार्गदर्शक सूचना प्रसिध्द केल्या. यामुळे शेतकरी, सुशिक्षित बेरोजगारांच्या तक्रारी मोठय़ा संख्येने सोडविण्यात यश मिळाले. महिनाभरात शेतकरी फसवणुकीबाबत प्राप्त ५९३ अर्जावर कारवाई करून ९७ गुन्हे दाखल करण्यात आले. त्यातून दोन कोटी ७४ हजार ५८२ इतकी रक्कम शेतकऱ्यांना परत मिळाली. २५ लाखाची रक्कम व्यापाऱ्यांनी परस्पर परत केली आहे. काही व्यापाऱ्यांकडून ५५ लाख रुपये आरटीजीएसमार्फत शेतकऱ्यांना परत मिळाली आहे. तसेच सव्वा तीन कोटींची रक्कम नजीकच्या काळात परत करण्याबाबत १०७ व्यापाऱ्यांनी तयारी दर्शविली. आतापर्यंत प्राप्त तक्रारींमध्ये नाशिक जिल्ह्यात ५५९, नंदुरबार १३, धुळे दोन, नगर जिल्ह्यात दोन आणि जळगाव जिल्ह्यातील १७ तक्रारींचा समावेश आहे.

नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्यांविरुध्द कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा डॉ. दिघावकर यांनी दिला. आतापर्यंत प्राप्त तक्रारींपैकी ३३ लाखहून अधिकची रक्कम परत मिळवून देण्यात आली आहे.

गुन्हेगार दत्तक योजना

परिक्षेत्रात मागील सात वर्षांत दरोडा, जबरी चोरी, सोनसाखळी, खंडणीचे गुन्हे, घरफोडी, अग्निशस्त्राबाबतचे गुन्ह्यांमधील आरोपींवर लक्ष ठेवणे आणि त्यांच्या हालचालींची माहिती मिळवण्यासाठी गुन्हेगार दत्तक योजना राबविली जात आहे. यासाठी प्रत्येक आरोपीवर लक्ष ठेवण्यासाठी एका पोलीस कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. या योजनेमुळे आरोपींवर वचक निर्माण होऊन गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यास मदत होईल, असा विश्वास डॉ. दिघावकर यांनी व्यक्त केला. या योजनेंतर्गत परिक्षेत्रातील ३७६५ गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी २७९३ पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.