चारूशीला कुलकर्णी

सरकारच्या ‘स्वच्छ भारत’ संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांनी पुढाकार घेतला आहे. बचत गटाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा जागर करताना स्वच्छ भारतासाठी महिला पुढे येत आहेत. तसेच, यातून उद्योजकीय मूल्य रुजविले जात असल्याचे ‘हिरकणी नवद्योजक महाराष्ट्राची’ उपक्रमातून दिसून आले. महिलांनी सुरू केलेल्या या प्रयोगशील उद्योगांना शासनाचे आर्थिक पाठबळ मिळत आहे.

‘स्वच्छ भारत अभियान’ ही संकल्पना रुजविण्यासाठी सरकार विविध माध्यमांतून, उपक्रमातून प्रयत्न करत आहे. यासाठी वेगवेगळ्या दिवसांचे औचित्य साधण्यात येत आहे. ग्रामीण भागातील महिलांनी एक पाऊल पुढे टाकत पर्यावरण संवर्धन-स्वच्छता अभियान आणि उद्योग याची सुरेख गुंफण केली आहे.

नुकतेच, जिल्हा कौशल्य विभाग, नावीन्यपूर्ण संकल्पना जिल्हास्तरीय सादरीकरण समिती यांच्या सहकार्याने आयोजित ‘हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची’ उपक्रमात ग्रामीण भागातील महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून स्वच्छता अभियानासाठी घेतलेला पुढाकार ठळकपणे समोर आला. इगतपुरी येथील साईकृपा महिला बतच गटाने गॅरेज परिसरात इतरत्र टाकून दिलेल्या टायरच्या आधारे पादत्राणे बनविण्याची संकल्पना मांडली आहे. गटाने गॅरेजच्या आवारात खराब सामान म्हणून फेकून दिलेले दुचाकी-चारचाकी वाहनांचे टायर जमा केले. त्यातील खराब भाग काढून वेगवेगळ्या यंत्रांच्या माध्यमातून त्यापासून पादत्राणे तयार केली. खराब असणाऱ्या टायरच्या भागाचा वापर हा पादत्राणांच्या ‘सोल’साठी करण्यात आला. यासाठी आवश्यक प्रशिक्षण औरंगाबाद येथून घेण्यात येणार आहे, तर काही महिलांनी प्रशिक्षण पूर्ण केले असल्याची माहिती साईकृपाच्या सचिव दुर्गा काळुंगे यांनी दिली. इगतपुरी, घोटी येथील काही पादत्राणे विकणाऱ्या व्यावसायिकांशी या संदर्भात चर्चा सुरू आहे.

सिन्नर येथील शिवपार्वतीने  गायीच्या शेणाचा वापर करण्याचे ठरविले. त्र्यंबकेश्वर येथे असा काही प्रकल्प सुरू आहे. त्या ठिकाणी जाऊन त्यांनी प्रशिक्षण घेतल्याचे गटाच्या अध्यक्षा सोनाली लोणारे यांनी सांगितले. ‘हिरकणी नवद्योजकांची’ या उपक्रमात या संकल्पनांची दखल प्रशासनाने घेतली असून त्यांना स्र्टाट अप धोरणा अंतर्गत दोन लाखांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे.

शेणापासून जाड सरपण

पाण्याचा वापर न करता यंत्राच्या मदतीने फक्त शेणापासून जाड सरपण तयार होते. हे सरपण दोन ते तीन दिवस वाळविल्यानंतर त्याचा उपयोग करता येईल. या शिवाय यापासून कुंडी, चौकोनी पाट तयार करता येतात. या व्यतिरिक्त काही करता येईल काय, या विषयी त्यांचे काम सुरू आहे. दरम्यान, ‘हिरकणी नवद्योजकांची’ या उपक्रमात या संकल्पनांची दखल प्रशासनाने घेतली असून त्यांना स्र्टाट अप धोरणा अंतर्गत दोन लाखांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे.