सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक येथील विभागीय केंद्राचे सक्षमीकरण केले जावे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील बंद झालेले अभ्यासक्रम पुन्हा सुरू करावेत, आदिवासी विकास विभागांतर्गतचे भाडेतत्त्वावरील वसतिगृह मध्यवर्ती भागात शासकीय जागेवर सुरू व्हावे आदी मुद्दय़ांचा समावेश असणारा ‘छात्रनामा’ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने प्रसिद्ध केला आहे.
शहरातील सर्व उमेदवारांची भेट घेऊन ‘अभाविप’च्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी निगडित असलेल्या या प्रश्नांकडे त्यांचे लक्ष वेधले. नाशिकच्या सर्वागीण विकासासाठी १४ मागण्यांचे समावेश असणारे पत्र सर्व प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना देण्यात आले.
पुणे विद्यापीठाच्या प्रस्तावित उपकेंद्राचे प्रलंबित काम तातडीने मार्गी लागण्याची गरज असून उपकेंद्रात विद्यापीठात चालणारे सर्व अभ्यासक्रम सुरू करण्यात यावेत, शहरात आयआयटी, एनआयटीसारख्या संस्था सुरू कराव्यात, आरोग्य विज्ञान विद्यापीठातील प्रस्तावित आयुर्वेद, होमिओपॅथी, फिजिओथेरपी अभ्यासक्रम तात्काळ सुरू करावे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट मुक्त विद्यापीठातील अनेक अभ्यासक्रम बंद झाल्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. हे अभ्यासक्रम पुन्हा सुरू व्हावेत, नाशिकमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी केली जावी, नवीन विद्यापीठ कायद्यानुसार महाविद्यालयीन, विद्यापीठ निवडणुका पुन्हा सुरू करण्यासाठी उमेदवारांनी पाठपुरावा करावा, अशा अपेक्षा ‘अभाविप’ने या जाहीरनाम्यात व्यक्त केल्या आहेत.
उद्योजकतेला वाव देण्यासाठी ‘बिझनेस इनक्युबेशन सेंटर’, आयटी पार्क उभारले जावे, विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत अभ्यासिका, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची उभारणी केली जावी, शेतीविषयक अभ्यासक्रमांचे महत्त्व लक्षात घेऊन कृषी विद्यापीठ, संशोधन केंद्राची स्थापना करावी, खेळाडूंसाठी क्रीडा संकुल असावे, शहर बस सेवा महाविद्यालयांच्या वेळेशी संलग्न केली जावी आदी प्रश्नांवरही उमेदवारांशी चर्चा करण्यात आली.
विद्यार्थी परिषदेचे जिल्हा संयोजक सागर शेलार, महानगरमंत्री अथर्व कुळकर्णी, महानगर सहमंत्री सिद्धेश खैरनार, राकेश साळुंके, रुपेश पाटील आदी यावेळी उपस्थित होते.