नाशिक : शहराजवळील वालदेवी धरण परिसरात शुक्र वारी सायंकाळी छायाचित्र काढताना पाण्यात बुडालेल्या सर्वच्या सर्व सहा जणांचे मृतदेह शनिवारी सकाळी बाहेर काढण्यात आले. यामध्ये पाच युवती आणि एका मुलाचा समावेश आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी हे सर्व धरणावर गेले होते. सर्व मयत हे नाशिक शहरातील रहिवासी आहेत.

लग्न सोहळ्यात भोजनव्यवस्था पुरविणाऱ्या संस्थेत काम करणारे नऊ जण शुक्रवारी वाढदिवस साजरा करण्यासाठी रिक्षातून वालदेवी धरणावर गेले होते. छायाचित्र काढताना तोल जाऊन काही जण पाण्यात पडले. त्यांना पोहता नव्हते. इतरांनी त्यांना वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. या घटनाक्रमात पाच मुली आणि एक युवक बुडाला. सहा जण बुडाल्याने त्यांचे तीन सहकारी हादरले. भयभीत झाल्याने ते घरी निघून गेले. त्यामध्ये रिक्षाचालकासह एका मुलीचाही समावेश आहे. संबंधितांच्या कुटुंबीयांना माहिती देऊन त्यांच्यासह ते पुन्हा धरणावर परतले. या घटनेची माहिती पोलिसांना विलंबाने देण्यात आली. त्यास पोलीस नाईक डी. जे. फडोळ यांनी दुजोरा दिला. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने शोध सुरू केल्यावर उशिरापर्यंत एकाचा मृतदेह हाती लागला. अंधार पडल्याने शनिवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. उर्वरित पाच जणांचे मृतदेह हाती लागले. या दुर्घटनेत आरती ऊर्फ राणी भालेराव (२२, मोरवाडी), हिम्मत चौधरी (१६, सिंहस्थनगर), नाजिया वजीर मणियार (१९), खुशी वजीर मणियार (१०, दोघी पाथर्डी फाटा), ज्योती गमे (१६) आणि सोनी गमे (१२, दोघी सिंहस्थनगर) यांचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याकडून देण्यात आली.

करोनाच्या पार्श्वभूमीवर, शहरासह जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. अशा स्थितीत युवक, युवती वालदेवी धरणावर फिरण्यासाठी गेलेच कसे, हा प्रश्न उपस्थित होत आहे. धरणावर गर्दी करणाऱ्यांचा पिंपळद, दहेगाव, राजुरबहुला, विल्होळी या आसपासच्या गावांतील ग्रामस्थांना त्रास होत असल्याकडे पिंपळदचे पोलीस पाटील सोमनाथ बेजेकर यांनी लक्ष वेधले.