27 May 2020

News Flash

Coronavirus outbreak  : माहिती दडविल्यास कारवाई

जिल्हाधिकारी मांढरे यांचा इशारा; नाशिकमध्ये दुसरा रुग्ण

प्रतीकात्मक छायाचित्र

जिल्हाधिकारी मांढरे यांचा इशारा; नाशिकमध्ये दुसरा रुग्ण

नाशिक : करोनाबाधित क्षेत्र वा व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांसह तशी काही लक्षणे वाटणाऱ्यांनी स्वत:हून पुढे यावे. लपून किंवा बनावट सबब पुढे करून संबंधित व्यक्ती  संसर्गाला कारणीभूत ठरल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिला आहे. दरम्यान, जिल्ह्य़ात दुसरा करोनाबाधीत रुग्ण आढळला असून तो नाशिक शहरातील आहे. दिल्लीतील निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेली ही व्यक्ती आहे. इतर ३४ जणांचे नमुने नकारात्मक आले.

राज्यासह जगात करोनाचे थैमान सुरू असताना यावर प्रशासनाने जिल्ह्य़ात प्रारंभीपासून उपाययोजना करत नियंत्रण ठेवले. काही दिवसांत बाहेरून काही लोकांनी जिल्ह्य़ात शिरकाव केल्याने आपल्याकडे कदाचित रुग्ण वाढतील, अशी स्थिती निर्माण केली गेली. जे लोक करोनाबाधित धार्मिक कार्यक्रम वा जिल्ह्य़ात गेले असतील तर त्यांनी  स्वत:हून आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. करोना हा एक आजार आहे. संभाव्य करोनाचे रुग्ण असू शकतात ही वाईट गोष्ट नाही. भविष्यात कोणी त्रास देईल, असेही होणार नाही. आज प्रत्येक रुग्णाला शोधण्यात प्रशासकीय यंत्रणेची क्षमता खर्च होत आहे. वेगवेगळ्या ठिकाणाहून याद्या येतात. त्यांच्या तपासणीत वेळ, शक्ती खर्च होत आहे. स्वत:हून समोर आल्यास प्रशासनाच्या वेळेची बचत करता येईल. करोनाबाधित भागातून आलेले, करोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या अथवा कोणालाही करोनाची लक्षणे जाणवत असल्यास त्यांनी तातडीने प्रशासनाशी संपर्क करावा, असे आवाहन मांढरे यांनी केले. जाणीवपूर्वक या व्यवस्थेपासून दूर राहिल्यास आणि नंतर संसर्गास कारणीभूत ठरल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. लपून राहणे, प्रशासकीय यंत्रणेला गुंगारा देणे गैर आहे. समोर येणाऱ्यांवर उपचार केले जातील. कुटुंबियांचे विलगीकरण केले जाईल. आजाराचा प्रसार रोखण्यासाठी संबंधितांनी पुढे यावे, असेही मांढरे यांनी म्हटले आहे.

दुसरा रुग्ण शहरातील

लासलगाव येथे अर्थात ग्रामीण भागात पहिला करोनाबाधीत आढळल्यानंतर दुसरा रुग्ण आता नाशिक शहरात आढळला आहे.  तो सिडको परिसरातील आहे. ३९ जणांचे अहवाल प्रलंबित होते. त्यातील ३५ जणांचे अहवाल सोमवारी प्राप्त झाले. यातील शहरातील एकास करोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. उर्वरित ३४ जणांचे अहवाल नकारात्मक आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. आतापर्यंत जिल्ह्य़ात ८९२ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. त्यातील २६५ जणांचे घरात तर ४७ जणांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे. २२५ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविले गेले. त्यातील १८५ जणांचे अहवाल नकारात्मक आले असून लासलगाव येथील एका युवकाचा अहवाल सकारात्मक आला. संबंधित व्यक्तीचा परदेशवारीचा इतिहास नाही. तो बाधित झाला आहे. सध्या ५६ संशयित वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. ५२४ प्रवाशांचा १४ दिवसांचा विलगीकरण कालावधी पूर्ण झाला आहे. १६९ जणांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. दरम्यान, दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमात नाशिकमधून २४ जण सहभागी झाल्याचे उघड झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2020 4:04 am

Web Title: second coronavirus infected patients found in nashik city zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 डॉक्टर-परिचारिकांची सुरक्षा ऐरणीवर !
2 नाशिकच्या ४० पेक्षा अधिक संशयित रूग्णांचे अहवाल प्रतिक्षेत
3 ‘गो करोना गो’ आरोळी महागात पडली
Just Now!
X