19 October 2019

News Flash

साडेचार वर्षांनंतर पुन्हा सेना-भाजपचे तुझ्या गळा, माझ्या गळा..

नाशिक, दिंडोरी, धुळे लोकसभा मतदार संघात समन्वयासाठी सेनेने भुसे आणि भाजपने महाजन यांच्यावर जबाबदारी टाकली आहे.

भाजप कार्यालयात प्रदीर्घ काळानंतर सेना-भाजप पदाधिकाऱ्यांचे आलिंगन       (छाया- यतीश भानू)

एकमेकांवर आगपाखड करणाऱ्या आणि स्थानिक निवडणुका परस्परांविरोधात लढणाऱ्या शिवसेना-भाजपमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी युती झाल्यानंतर आता मनोमीलनाची धडपड सुरू झाली आहे. त्याअंतर्गत रविवारी आयोजित मनोमीलन सभेच्या तयारीसाठी उभय पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांची पहिलीच बैठक शुक्रवारी भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात झाली. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजप-सेना पदाधिकाऱ्यांची अशी बैठक झाली होती. त्यानंतर विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले. उभयतांमध्ये कमालीचे मतभेद निर्माण झाले. साडेचार वर्षांनंतर प्रथमच दोन्ही पक्षांचे पदाधिकारी असे एकत्र आले. युती धर्म पाळण्याचे मान्य करत प्रचार, समन्वय साधण्यासाठी दोन्ही पक्षांच्या सदस्यांचा अंतर्भाव असणारी समन्वय समिती स्थापन करण्यात आली.

सेना-भाजप युती झाल्यानंतर नाशिक विभागात समन्वय दृढ करण्याची जबाबदारी शिवसेनेचे दादा भुसे आणि भाजपचे गिरीश महाजन या मंत्र्यांवर सोपविण्यात आली आहे. गेल्या चार वर्षांत दोन्ही पक्षांमध्ये कमालीचे वितुष्ट निर्माण झाले. लोकसभा निवडणुकीपूर्वी दुभंगलेली मने जोडण्याची कसरत सुरू झाली आहे. त्या अंतर्गत रविवारी सायंकाळी पाच वाजता चोपडा लॉन्स येथे मनोमीलन सभा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या सभेच्या नियोजनासाठी शुक्रवारी स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. शिवसेनेचे राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी,  जिल्हाप्रमुख विजय करंजकर, पालिकेतील विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्यासह अन्य पदाधिकारी भाजप कार्यालयात पोहचले. भाजपचे प्रदेश पदाधिकारी लक्ष्मण सावजी, वसंत गिते, शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप, आमदार सीमा हिरे, जिल्हाध्यक्ष दादा जाधव आदींनी त्यांचे स्वागत केले. उभयतांमध्ये बंद दाराआड तासभर चर्चा झाली.

नाशिक, दिंडोरी, धुळे लोकसभा मतदार संघात समन्वयासाठी सेनेने भुसे आणि भाजपने महाजन यांच्यावर जबाबदारी टाकली आहे. स्थानिक पातळीवर प्रचारात योग्य समन्वय राखण्यासाठी भाजप, सेनेच्या प्रत्येकी पाच प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश असणारी समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी दोन्ही पक्षांची भक्कम फळी उभी करण्याचे निश्चित झाले. प्रदीर्घ काळानंतर भेटणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर वेगवेगळे भाव दिसत होते. दोन्ही पक्षांमध्ये काही मुद्यांवर मतभेद होते, पण मनभेद नव्हते अशी सारवासारव काहींनी केली. युतीचा धर्म पाळण्याचे मान्य करत हसतमुखाने पदाधिकाऱ्यांनी परस्परांचा निरोप घेतला. समन्वय समितीत भाजपकडून जादा पदाधिकाऱ्यांची नावे सांगितली जात होती. परंतु, बैठकीत प्रत्येक पक्षाचे पाच असे एकूण १० जण राहणार असल्याचे सेनेच्या पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले. या समितीमार्फत निवडणुकीतील प्रचाराचे नियोजन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

First Published on March 16, 2019 12:29 am

Web Title: sena bjp reunite afer four year