News Flash

लष्करी हवाई दलास स्वतंत्र ध्वज

३३ वर्षांच्या अथक परिश्रमाचा राष्ट्रपतींच्या हस्ते गुरुवारी गौरव

३३ वर्षांच्या अथक परिश्रमाचा राष्ट्रपतींच्या हस्ते गुरुवारी गौरव

अनिकेत साठे, नाशिक

तब्बल २१ हजार फूट उंचीवरील बर्फाच्छादित सीमेवरील रसदपुरवठा असो, की नैसर्गिक संकटात कोणत्याही भागातील बचावकार्य असो.. गेल्या ३३ वर्षांत युद्ध आणि शांतता काळात लष्करी हवाई दलाने बजावलेल्या कामगिरीचा गौरव येत्या गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते विशिष्ट रंगाचे निशाण (ध्वज) देऊन करण्यात येणार आहे. या सोहळ्यात सरसेनापतींना हेलिकॉप्टर मानवंदना देण्यात येईल. त्यातून या दलाची क्षमता अधोरेखित केली जाईल. या संचलनात रुद्र हे लढाऊ हेलिकॉप्टर प्रथमच भाग घेणार आहे.

युद्धभूमीवर सेना विशिष्ट रंगाचा ध्वज घेऊन लढत असते. सैन्यातील एखादा विभाग पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर राष्ट्रपतींच्या हस्ते त्यास निशाण देऊन सन्मानित करण्याची परंपरा आहे. संबंधित विभागास एकदाच हा बहुमान मिळतो. हे निशाण त्या दलाची ओळख बनते. १ नोव्हेंबर १९८६ रोजी स्थापन झालेल्या लष्करी हवाई दलास खडतर वाटचाल आणि अथक परिश्रमानंतर हे निशाण बहाल करण्यात येत आहे. प्रारंभी म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळात हे दल भारतीय हवाई दलाच्या अखत्यारीत होते.

लष्कराच्या दैनंदिन कामांसाठी हवाई दलावर विसंबून राहणे अवघड ठरते. यामुळे जगातील बडय़ा राष्ट्रांनी लष्करात स्वतंत्र छोटेखानी हवाई दलाची निर्मिती केली आहे.

त्याच धर्तीवर या दलाची स्थापना झाल्यानंतर देशासह सीमावर्ती भागात नव्या तळांची उभारणी करण्यात आली.

अंधारात कारवाईची क्षमता : हवाई दलाची स्थापना झाली, तेव्हा वैमानिकांची कमतरता होती. गांधीनगर येथे कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन स्कूलची स्थापना करून ती उणीव भरून काढण्यात आली. आज दलाकडे जितकी हेलिकॉप्टर्स आहेत, त्यापेक्षा अधिक प्रशिक्षित वैमानिक आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सुरक्षित उड्डाणावर दलाचा भर आहे. दुर्गम भागात अंधारातही कारवाईची क्षमता दलाकडे आहे.

लढाऊ दलाचा दर्जा

लष्कराचे साहाय्यकारी दल अशी ओळख असलेले लष्करी हवाई दल ‘लढाऊ दल’ म्हणून रूपांतरित होत आहे. रॉकेट-क्षेपणास्त्र डागण्याची व्यवस्था, दूरवर मारा करू शकणारी बंदूक यासह आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण रुद्र हेलिकॉप्टरची तुकडी स्थापन झाली आहे. या हेलिकॉप्टरमुळे वैमानिकाला थेट शत्रूवर तुटून पडण्याची क्षमता प्राप्त झाली. काळ्या रंगातील हे लढाऊ हेलिकॉप्टर अशा सोहळ्यात प्रथमच सहभागी होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कामगिरीचा पट

’१९८४ मध्ये सियाचीनमध्ये मेघदूत, श्रीलंकेतील पवन, १९९९ मध्ये कारगिल युद्धातील मोहिमेत सहभाग

’अतिरेकीविरोधी, बंडखोरांविरुद्धच्या कारवायांमध्ये योगदान

’अमरनाथ यात्रा, उत्तरांचलमध्ये दरडी कोसळण्याच्या घटना, गुजरात भूकंप, काश्मीर भूकंपात बचावकार्य

’महाराष्ट्र आणि गुजरातमधील पूरस्थिती, लेहमधील ढगफुटीवेळी बचाव मोहिमेत सहभाग

’संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेनेत सोमालिया आणि काँगोमध्ये कार्य

’१९४७-४८ मध्ये जम्मू-काश्मीर, १९६५ आणि १९७१ मधील भारत-पाक युद्धात कर्तृत्व सिद्ध

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2019 4:41 am

Web Title: separate flag for indian air force zws 70
Next Stories
1 जिल्ह्य़ात तिरंगी, चौरंगी लढती
2 झेंडुचा भाव वधारला
3 शहरातील पाच लाख मतदार  आरक्षण विरोधात ‘नोटा’ वापरणार
Just Now!
X