बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात माजी मंत्री छगन भुजबळ यांना अटक झाल्यानंतर तब्बल नऊ महिने नाशिककडे न फिरकणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नवीन वर्षांत अखेर आगमन होत आहे. नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीची जिल्ह्य़ात पुरती वाताहत झाली. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ५ जानेवारी रोजी पिंपळगाव बसवंत येथे पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. यानिमित्त हा दौरा होत आहे.

अनेक महिन्यांनंतर पक्षाध्यक्ष येणार असल्याने त्यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची शनिवारी येथे बैठक पार पडली. बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात आधी पक्षाचे माजी खासदार समीर भुजबळ आणि नंतर १४ मार्च २०१६ रोजी छगन भुजबळांनाही अटक झाली होती. त्याच्या दोन दिवस आधी पवार हे नाशिक दौऱ्यावर होते. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात उभारलेल्या यशवंतराव चव्हाण कला दालनाचे उद्घाटन आणि ‘यशवंतराव चव्हाण आणि आधुनिक महाराष्ट्र’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले होते. अर्थात, त्या वेळी हा राजकीय दौरा नव्हता. भुजबळांना अटक झाल्यानंतर आजतागायत नाशिकला येणे त्यांनी टाळले. काही कार्यक्रमानिमित्त ते येणार असल्याचे सांगितले गेले. परंतु ऐनवेळी दौरा रद्द झाल्याचे स्थानिक पदाधिकारी सांगतात. या काळात प्रदेशाध्यक्ष, खा. सुप्रिया सुळे व इतर नेत्यांनी येथे दाखल होत पक्षाला उभारी देण्यासाठी धडपड केली. अलीकडेच राष्ट्रवादीचे माजी खासदार देवीदास पिंगळे यांना नाशिक बाजार समितीतील कर्मचाऱ्यांची ५८ लाखांची रक्कम हडपण्याच्या प्रयत्नात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. पक्षाचा माजी पदाधिकारी छबू नागरे तर बनावट चलन छपाईच्या प्रकरणात गजाआड झाला. या घडामोडींमुळे राष्ट्रवादीची प्रतिमा डागाळल्याचा आक्षेप घेऊन महापालिका निवडणुकीत आघाडीबाबत पुनर्विचार केला जाणार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. नाशिक महापालिकेतील राष्ट्रवादीच्या अनेक नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. नगरपालिका निवडणूक प्रचारात दुसऱ्या फळीवर राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने भिस्त ठेवली. मात्र पक्षाला दारुण पराभवाला तोंड द्यावे लागले. वास्तविक कृषी उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या नाशिककडे पवार यांचे नेहमीच विशेष लक्ष असते. शेतीतील बारीकसारीक माहिती जाणणारा नेता म्हणून शेतकरी त्यांच्याकडे पाहतात. भुजबळांची अटक आणि राष्ट्रवादीच्या माजी खासदार व पदाधिकाऱ्यांच्या उद्योगामुळे राष्ट्रवादीचे पाय खोलात चालले असताना पवार यांनी पुन्हा नाशिककडे लक्ष देण्याचे संकेत दिले आहेत.