शरद पवार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी

सध्या देशातील आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील शेती आणि शेतक ऱ्यांची स्थिती खूप विदारक असून, त्यांना तातडीने मदत करणे गरजेचे असल्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून केली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भिलार येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

भिलार येथील ‘पुस्तकांच्या गावा’स भेट दिल्यानंतर पवार शनिवारी पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, की महाराष्ट्रातील शेतक ऱ्यांच्या प्रश्नी आपण नुकतीच ४ मे रोजी मोदी यांची भेट घेऊन ही समस्या त्यांच्या कानावर घातली. या वेळी आपण त्यांना शेतक ऱ्यांना कर्जमाफी द्यावीच लागेल असे सांगितले. भाजपनेच त्यांच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचा उल्लेख केलेला आहे.  देशातील शेतकऱ्यांमध्ये सध्या प्रचंड अस्वस्थता आहे. या पाश्र्वभूमीवर तुम्हाला त्यांच्या मदतीबाबत काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल.  उत्तर प्रदेशातील कर्जमाफीचा उल्लेख करत पवार म्हणाले, की काल आलेले योगी आदित्यनाथ कर्जमाफीचा निर्णय घेतात आणि मोदी घेऊ शकत नाहीत याचे आश्चर्य वाटते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी नाहीतर किमान काही प्रमाणात मदत करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना आता काहीतरी मदत करून त्यांचा विश्वास टिकवणे महत्त्वाचे आहे.

मोदींपेक्षा वाजपेयी सरस

नरेंद्र मोदी आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या काम करण्याच्या पद्धतीची तुलना करत पवार म्हणाले, की हे दोन्हीही नेते प्रचंड काम करणारे. परंतु त्यांची काम करण्याची पद्धत निराळी आहे. मोदी स्वत: जास्त वेळ काम करतात, पण त्यांच्या कामात मीपणा खूप आहे. दुसरीकडे वाजपेयीदेखील मोदींएवढेच काम करायचे, पण ते सर्वाना बरोबर घेऊन काम करत होते. त्यांच्या या सांघिक कौशल्यामुळे अनेक प्रश्न सुटण्यास मदत होत होती.