माजी महापौर यतीन वाघसह तिघांचा शिवसेना प्रवेश
वर्षभरावर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय पक्षांनी जय्यत तयारी सुरू केली असून त्याचे प्रत्यंतर सोमवारी शिवसेनेने पालिकेतील सत्ताधारी मनसेसह भाजपला दिलेल्या धक्क्यांनी अधोरेखित झाले आहे. माजी आमदार वसंत गीते यांच्या पाठोपाठ भाजपवासी होण्याची अटकळ बांधली जाणारे मनसेचे माजी महापौर अ‍ॅड. यतीन वाघ यांच्यासह स्थायी समितीचे माजी सभापती आर. डी. धोंगडे आणि माजी सदस्य अरविंद शेळके यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या माध्यमातून सेनेने एकाच दगडात दोन पक्षी मारल्याचे दिसत आहे. पुढील काळात प्रत्येक आठवडय़ाला असे धक्के दिले जाणार असल्याचे सेनेच्या संपर्कप्रमुखांनी म्हटले आहे. सेनेत प्रवेश करणाऱ्या इच्छुकांमध्ये भाजपच्या नगरसेवकांचा समावेश राहणार काय, यावर ‘थांबा व पाहा’ असे सूचक संकेत दिल्यामुळे युतीतील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर पक्षांतराची आलेली लाट मध्यंतरी काही काळ थांबली असली तरी पालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर त्यास श्रीगणेशा झाला आहे.
मनसेचे माजी आमदार व भाजपवासी झालेल्या गीते यांचे अ‍ॅड. वाघ हे समर्थक मानले जातात. प्रभाग समितीच्या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या बाजूने कौल दिल्यामुळे ते त्याच पक्षात प्रवेश करतील, अशी बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. तथापि, सर्वाना धक्का देत सेनेने वाघ यांच्यासह मनसेच्या अन्य दोन प्रमुख पदाधिकाऱ्यांना स्वगृही आणण्यात यश मिळविले.
मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अ‍ॅड. वाघ, धोंगडे व शेळके यांचा प्रवेश सोहळा पार पडला. या वेळी संपर्कप्रमुख अजय चौधरी उपस्थित होते.
शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी याबद्दल काहीसे अनभिज्ञ असल्याचे जाणवले. राजकीय पातळीवर वेगवेगळ्या चर्चा होतच असतात. परंतु, त्यात कोणतेही तथ्य नसते, असे अ‍ॅड. वाघ यांनी स्पष्ट केले. मातोश्रीवरून दूरध्वनी आल्यावर आम्ही मुंबईला गेलो. ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. कोणत्याही अटी-शर्तीविना हा प्रवेश केल्याचे वाघ यांनी सांगितले. धोंगडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा कोणता प्रश्नच नसल्याचे स्पष्ट केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा सर्वच पक्षांना प्रत्येक आठवडय़ाला धक्के दिले जाणार आहेत. शिवसेनेत येणाऱ्या इच्छुकांमध्ये भाजपच्या नगरसेवकांचा समावेश आहे काय, यावर चौधरी यांनी त्याची स्पष्टता लवकर होईल असे सांगत फारसे बोलणे टाळले.
आगामी निवडणूक स्वबळावर लढविण्यासाठी सेनेची तयारी सुरू असून त्या अनुषंगाने फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. या प्रक्रियेत भाजपला पिछाडीवर टाकण्यात तूर्तास शिवसेना यशस्वी झाली आहे.

अलीकडेच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिक महापालिकेत शिवसेना हा क्रमांक एकचा शत्रू असल्याचे सांगत आगामी निवडणूक स्वबळावर लढविण्याचे स्पष्ट केले आहे. या व्यूहरचनेला तोंड देण्यासाठी शिवसेनेने भाजपची कोंडी करण्याचे धोरण अवलंबल्याचे वारंवार पाहावयास मिळाले. त्याचा पुढील अध्याय आता सर्वपक्षीय नगरसेवक फोडण्यात आघाडी घेऊन सेनेने सुरू केला आहे. मनसेसह सर्वपक्षीय नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचे भाजपच्या नेत्यांकडून जे सांगितले जाते, ती निव्वळ अफवा असल्याचे संपर्कप्रमुख चौधरी यांनी सांगितले. मनसेच्या नगरसेवकांबाबत भाजपने हे तंत्र अवलंबले परंतु, तिन्ही नगरसेवकांना स्वगृही अर्थात शिवसेनेत परतायचे होते यावर शिक्कामोर्तब झाले आहे.