सुमारे चार महिन्यांच्या कालावधीनंतर पाकच्या तावडीतून सुखरूप मायदेशी परतलेला लष्कराचा जवान चंदू चव्हाण आता भारतीय लष्कर व गुप्तचर यंत्रणांच्या चौकशीच्या फेऱ्यात सापडणार आहे. वरिष्ठांशी झालेल्या मतभेदांतून रागाच्या भरात चंदूने सीमा ओलांडल्याचे सांगितले जाते. या चौकशीत चंदू दोषी आढळलाच तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाऊ शकते.

पाक लष्कराच्या ताब्यातून सुखरूप सुटका झाल्यानंतर अमृतसरच्या लष्करी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी होऊन चंदूला लष्कराच्या स्वाधीन करण्यात आले. ३७ राष्ट्रीय रायफल्सचा जवान असलेल्या चंदूची स्थिरस्थावर झाल्यानंतर रॉ, आयबी, लष्करी गुप्तचर यंत्रणा यांच्यासह लष्करामार्फत विविध पातळ्यांवर चौकशी केली जाईल असे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. पाकिस्तानमध्ये या काळात तो कुठे वास्तव्यास होता, तिथे काय घडले याची माहिती संकलित केली जाईलच. पण, सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याचे सीमा ओलांडण्यामागील कारण जाणून घेतले जाईल. सीमा ओलांडण्याची कृती ही त्याने जाणूनबुजून केलेली होती का, याची छाननी प्रथम केली जाणार आहे. त्याच्याकडून चुकीने हा प्रकार घडला असला तरी ती चूक गंभीरच समजली जाईल आणि त्याने जाणूनबुजून तशी कृती केली असेल तरीही त्याच्यावर कारवाईची टांगती तलवार असेल, असे संबंधित अधिकाऱ्यांनी नमूद केले. सीमेवर गस्त घालताना काय दक्षता घ्यावी, याचेही नियम आहेत. त्यानुसार सीमेवर तैनात असलेला जवान एकटा जवान कुठेही भ्रमंती करू शकत नाही. कारण, एखादी छोटीशी चूक त्याच्या जिवावर बेतणारी असते. या स्थितीत समोर शत्रू प्रदेश आहे हे ज्ञात असूनही आपली चौकी सोडून थेट त्या प्रदेशात शिरणे ही अक्षम्य कृती ठरते, असे मत निवृत्त कर्नल आनंद देशपांडे यांनी नोंदवले.