वैद्यकीय साहित्याच्या किंमतीकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष

नाशिक : करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून सॅनिटायझर, हातमोजे वा अन्य वैद्यकीय साहित्याची वाढलेली मागणी आजतागायत कायम आहे. या संकट काळात वैद्यकीय साहित्य निर्मिती करणाऱ्यांनी चढय़ा दराने त्यांची विक्री सुरूच ठेवली आहे. करोनाची भीती आणि बचावासाठी महागडे साहित्य अशा दुहेरी कचाटय़ात सामान्य नागरिक सापडले  आहेत.

अन्न औषध विभागाने अमृतधाम परिसरात विना परवाना उत्पादित केलेला सॅनिटायझरचा साठा जप्त केला. परंतु, या विभागाने घाऊक आणि किरकोळ व्यापाऱ्यांकडून चढय़ा भावाने विक्री होणाऱ्या वैद्यकीय साहित्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले.

सुरुवातीला सॅनिटायझरचा प्रचंड तुटवडा होता. तेव्हां वाट्टेल त्या किंमतीला त्यांची विक्री झाली होती. अशी दरवाढ अनेक वैद्यकीय साहित्याबाबत झाली आहे. खासगी रुग्णालयात जे साहित्य वापरले जाते, त्याची भरपाई रुग्णांना करावी लागते. मुखपट्टी असो वा अन्य सामग्री. त्याचा अतिरिक्त भार रुग्णाकडून वसूल केला जातो. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घरोघरी तसेच कार्यालयात स्वच्छतेला महत्व दिले गेले. सॅनिटायझर, मुखपट्टी, हातमोजे, फवारणीसाठी लागणारे औषध वा तत्सम अनेक साहित्याची खरेदी वाढली. त्याची निर्मिती करणारे आणि विकणारे अशा सर्वानी वाहत्या गंगेत हात धुणे पसंत केल्याचे चित्र आहे.

प्रारंभीच्या काही कारवाई वगळता दोन ते अडीच महिन्यानंतर अन्न औषध प्रशासनाने विनापरवाना सॅनिटायझर जप्त करण्याची कारवाई झाली. अमृतधामच्या कलानगर परिसरात गोल्डन ओशन कॉस्मेटिक्स या संस्थेच्या नावाने असणाऱ्या बंगल्यात सॅनिटायझर आणि हॅण्डवॉशचे उत्पादन होत असल्याची माहिती मिळाल्यावर औषध निरीक्षकांनी छापा टाकला. उत्पादन परवाना नसताना सॅनिटायझर, हॅण्ड वॉश, कच्चा आणि पक्का माल असा २२ हजारहून अधिक रुपयांचा माल जप्त करण्यात आला. या विभागाचे  सहआयुक्त (औषधे) दुष्यंत भामरे यांनी ही माहिती दिली.

या कारवाईत काढलेले नमुने चाचणीसाठी औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. असाच विना परवाना उत्पादित सॅनिटायझरचा मोठा साठा या विभागाने गोळे कॉलनीतील दोन घाऊक औषध विक्रेत्यांकडून हस्तगत केला होता. त्याचे पुढे काय झाले ते समजलेच नाही. सॅनिटायझर मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाने १० औषध उत्पादक आणि १३ डिस्टलरी अशा एकूण २३ उत्पादकांना उत्पादनाचे परवाने मंजूर केलेले आहेत. विना परवाना सॅनिटायझरची निर्मिती, साठा करणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या अन्न औषध प्रशासनाने घाऊक आणि किरकोळ औषध विक्रेत्यांकडून ग्राहकांची चाललेली आर्थिक लुबाडणूक थांबविण्यासाठी प्राधान्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

२०० ते ३०० टक्क्य़ांनी किंमत वाढ

करोना संकटाआधी म्हणजे अगदी मार्चच्या सुरूवातीला वैद्यकीय साहित्याच्या ज्या किंमती होत्या, त्यामध्ये २०० ते ३०० टक्क्य़ांनी वाढ झालेली आहे. रुग्णालयात शस्त्रक्रिया किंवा तत्सम कामांसाठी जे हातमोजे वापरले जातात, त्याचे पाकीट (१०० नग) आधी २५० ते ३०० रुपयांना मिळायचे. आता त्याची किंमत ९०० रुपयांच्या घरात आहे. एकदा वापरण्यायोग्य मुखपट्टी तीन ते पाच रुपयांना होती. त्यांच्या किंमती आता पाच ते आठ पटीने वाढल्या आहेत. र्निजतुकीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनाची पाच लिटरची किंमत १५० रुपये होती. ती आज ४०० ते ५०० रुपयांच्या घरात गेली आहे.