चोरीच्या तक्रारीत हद्दीच्या वादाने तरुणास मनस्ताप

रेल्वे स्थानक परिसरात चोरटय़ाने पाकीट लंपास केल्यानंतर प्रारंभी हद्दीचा वाद, अपुरे मनुष्यबळ, तांत्रिक अडचणी पुढे करत तक्रार दाखल करवून घेण्यास टाळाटाळ केली गेली. रेल्वे पोलिसांच्या अशा वेळकाढू धोरणामुळे एका युवकास नाहक मनस्ताप तर सहन करावा लागलाच पण त्यास एका नामांकित कंपनीत नोकरीसाठी मुलाखत देण्याची संधी गमवावी लागली.

पाथर्डी फाटा परिसरात वास्तव्यास असलेल्या गौतम शेट्टीला बंगळुरूस्थित नामांकित कंपनीकडून मुलाखतीसाठीचे पत्र प्राप्त झाले. त्याकरिता जाण्यासाठी त्याने रेल्वेचा पर्याय निवडला. नाशिक रोड रेल्वेस्थानक गाठले. सकाळी सातच्या सेवाग्राम एक्सप्रेसने ठाणे व तेथून पुढे साडेअकरा वाजता बंगळुरूला जाणारी रेल्वे असे नियोजन होते. या नियोजनावर त्याचा गाफिलपणा तसेच रेल्वे पोलिसांच्या कार्यशैलीने पाणी फेरले.

असा प्रकार घडला

नाशिक रोड रेल्वे स्थानकात सेवाग्राम एक्स्प्रेसमध्ये चढत असताना चोराने गौतम शेट्टीचे पाकीट चोरले. नाशिक येथील नातेवाईक त्या वेळी रेल्वे स्थानकावरच होते, त्यांना पाकीट हरविल्याची तक्रार नोंदविण्यास गौतमने सांगितले. नातेवाईक तक्रार नोंदविण्यासाठी रेल्वे पोलिसांकडे गेले असता संबंधित व्यक्ती स्वत हवी, असे सांगत त्यांची बोळवण करण्यात आली. दरम्यानच्या काळात इगतपुरी रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यास नातेवाईकांनी सुचविले. यामुळे गौतमने गाडी सोडून इगतपुरी रेल्वे पोलिसांसमोर तक्रार मांडली. तेव्हा ही घटना नाशिक रोड रेल्वे स्थानकावर घडली असल्याने तेथेच तक्रार नोंदवा, असे इगतपुरीच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याने गौतमला पुन्हा नाशिक रोड रेल्वेस्थानक गाठावे लागले. नाशिक रोड स्थानकात तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला असता तो परप्रांतीय आहे, असे समजत त्यांची तक्रार घेण्यास टाळाटाळ करण्यात आली. मराठीत संवाद साधल्यावर अखेर रेल्वे पोलिसांनी त्याची दखल घेतली. तक्रार नोंदविण्यासाठी आधी रेल्वे तिकीट द्या, जेणेकरून तुम्ही रेल्वेने प्रवास करीत होता हे ग्राह्य़ धरले जाईल असा मुद्दा उपस्थित करण्यात आला. जे पाकीट लंपास झाले, त्यातच तिकीट, रोख रक्कम, पॅनकार्ड, एटीएम आदी महत्त्वाच्या वस्तू होत्या. त्यामुळे देऊ शकत नसल्याचे गौतमने सांगितले असता चोरी झाली हे खरे कसे मानायचे, असा प्रश्न पोलिसांनी उपस्थित केला. सीसीटीव्हीच्या चित्रणावरून चोरटय़ाचा माग काढता येईल, असे सुचविले असता त्या बाजूला सीसीटीव्ही कॅमेराच नसल्याचे आढळून आले.

दूरवरच्या कॅमेऱ्यात गाडीत चढण्या उतरण्याचे काही चित्रण कैद होते. मात्र तेही दाखविण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली. फलाट तिकीट दिल्यानंतर गौतमची तक्रार नोंदविली गेली. परंतु यामध्ये बराच वेळ गेला आणि अपेक्षित कारवाई झालीच नाही. या सर्व घडामोडीत पुढील बेंगळूरूची रेल्वे चुकल्याने नामांकित कंपनी काम करण्याची चांगली संधी गेल्याने हताश मनाने गौतमला घरी परतावे लागले.

दखल न घेणाऱ्यावर कारवाई

तक्रारदाराशी आपण संपर्क साधला आहे. संबंधिताकडून अधिक माहिती घेऊन त्यांची तक्रार नोंदवून घेण्यास कोणी विलंब केला याची शहानिशा केली जाईल. त्यात दोषी आढळणाऱ्या संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाईल.

नितीन पवार (अधिकारी, रेल्वे पोलीस)

केवळ वेळकाढूपणा.

माझी तक्रार नोंदविण्यास दोन ते तीन तास घेतले. यामध्ये वेळ वाया गेला. तक्रार नोंदविण्यास उशीर का, याचे उत्तर रेल्वे पोलीस देऊ शकले नाहीत. हद्द, तांत्रिक अडचणींचा बागुलबुवा करून केवळ काम करीत असल्याचा देखावा निर्माण केला. पण त्या संदर्भात ठोस कृती केलीच नाही.

गौतम शेट्टी (प्रवासी)