उत्तर महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी कुठे एकत्रित तर कुठे विरोधात गट स्थापून गावावर आपली पकड राखण्याच्या केलेल्या प्रयत्नातून तेच पुन्हा अधोरेखित झाले. अनेक ठिकाणी प्रस्थापितांना नाकारून मतदारांनी नवीन चेहरे, तरुणांना संधी दिली. आपला सवतासुभा राखताना माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासारख्या काही नेत्यांची दमछाक झाली. छगन भुजबळ यांना देखील गटबाजी रोखता आली नाही.

गावातील महत्त्वाचे सत्ताकेंद्र आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी सर्वपक्षीयांनी गट स्थापताना पक्षीय राजकारणापलीकडे विचार केल्याचे दिसून आले. गावातील स्थानिक गट-तट आणि भाऊबंदकी प्रकर्षांने पाहायला मिळाली. राज्यात सत्तेत असलेल्या पक्षांच्या मंडळींनी अनेक ठिकाणी विरोधकांशी हातमिळवणी केली. तरीदेखील निकालानंतर प्रत्येक पक्षाने दावे, प्रतिदावे करण्यात कसर सोडली नाही. यात राष्ट्रवादीची नेतेमंडळी आघाडीवर होती. विरोधकांनी निकालाचा अभ्यास करावा, असा सल्ला छगन भुजबळ यांनी दिला. परंतु, त्यांच्याच येवला मतदारसंघात राष्ट्रवादीत गटबाजी झाली. त्यामुळे काही ग्रामपंचायतीत त्रिशंकू तर काही ठिकाणी त्यांचे खंदे समर्थक पराभूत झाल्याने ‘गड आला, पण सिंह गेला’ अशी अवस्था झाली. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिंडोरी मतदारसंघात निवडणुका बिनविरोध व्हाव्यात म्हणून आमदार निधी देण्याची तयारी दर्शविली होती. तथापि, गावकीच्या राजकारणाने त्यांचे आवाहन झिडकारले. मालेगाव तालुक्यात वेगळेच समीकरण आकारास आले. शिवसेनेला शह देण्यासाठी बहुसंख्य ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपशी सोयरीक जमवली. अनेक ग्रामपंचायतीत परिवर्तन झाले.

जळगावमध्ये प्रस्थापितांना धक्का

जळगाव जिल्ह्य़ात वेगळी स्थिती नव्हती. अनेक ग्रामपंचायतीत प्रस्थापितांना घरचा रस्ता दाखविला गेला. एकनाथ खडसे यांच्या गटास कोथळी गावात निसटता विजय मिळाला. कट्टर विरोधक अपक्ष आमदार आणि शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या गटाने पाच जागा जिंकून खडसेंच्या नाकीनऊ आणले. जामनेरमध्ये भाजप अर्थात आमदार गिरीश महाजन यांच्या गटाने वर्चस्व राखले. जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना पाळधी गावात सेनेतील गटबाजी रोखता आली नाही. शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली. निकालानंतर निवडून आलेले आणि पराभूत दोन्ही आमचे कार्यकर्ते असल्याची सारवासारव त्यांना करावी लागली. जळगावचे आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे यांच्या वाघळी या मूळ गावातील ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीच्या गटाने विजय मिळवला. दुसरीकडे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील यांच्या गटाला भाऊबंदकीत नवख्या उमेदवारांनी पराभूत केले. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्य़ात लोकप्रतिनिधींनी गावांवरील आपली पकड कायम राखली. आ. जयकुमार रावल, आ. कुणाल पाटील आदी राजकीय घराण्यांनी आपापल्या प्रभाव क्षेत्रात समर्थकांच्या माध्यमातून वर्चस्व कायम ठेवले. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना कोपर्ली ग्रामपंचायतीत धक्का बसला. धडगाव, नवापूरमध्ये काँग्रेसच्या गटांनी अनेक ग्रामपंचायतींवर विजय प्राप्त केला. शहादा तालुक्यात सर्वपक्षीय गटांची इतकी सरमिसळ झाली की, नेमकी सत्ता कुणाची याची स्पष्टता होणे कठीण बनले. आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्य़ात या निवडणुकीतून शिवसेनेने हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे.