25 October 2020

News Flash

‘स्वाभीमानी’ची निवडणूकपूर्व मोर्चेबांधणी

काही वर्षांत स्वाभिमानी शेतकरी संघटना ग्रामीण भागात आपले पाय रोवण्यासाठी धडपड करीत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

निफाडमध्ये उद्या ऊस, कांदा, द्राक्ष परिषद

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शेतकरी आंदोलनाचा केंद्रबिंदू राहिलेल्या नाशिक जिल्ह्य़ात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपले बस्तान बसविण्याची तयारी सुरू केली आहे. विधानसभेच्या सहा तर लोकसभेची एक जागा लढविण्याचे स्वाभिमानीने आधीच जाहीर केले आहे. गुरुवारी नाशिक जिल्ह्य़ात निफाडमध्ये खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत गोदा-कादवा ऊस, कांदा, द्राक्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत संघटना आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न करणार आहे.

काही वर्षांत स्वाभिमानी शेतकरी संघटना ग्रामीण भागात आपले पाय रोवण्यासाठी धडपड करीत आहे. कांदा, द्राक्षासह, कृषिमाल-दुधाचे भाव, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, साखर कारखाना, शेतकरी संप आदींवरून संघटनेने वारंवार आंदोलने केली. मागील दौऱ्यावेळी शेट्टी यांनी आगामी निवडणुकीत ग्रामीण भागातील काही मतदार संघांमध्ये पक्षाचे उमेदवार उभे करण्याचे निश्चित केले होते. गुरुवारी होणारा शेट्टी यांचा नाशिक दौरा आणि त्यातील कार्यक्रमांवर नजर टाकल्यास निवडणुकीची मोर्चेबांधणी अधोरेखित होत आहे. या दौऱ्यातील कार्यक्रमाची माहिती स्वाभिमानीचे युवा प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांनी दिली.

शेतकरी प्रश्नावर भाजप सरकारची धोरणे शेतीला मारक असून या विरोधात आता आर-पारची लढाई लढली जाणार असल्याचे वडघुले यांनी सूचित केले. निफाड तालुक्यातील करंजगाव येथे गुरुवारी सायंकाळी सहा वाजता गोदा-कालवा ऊस, कांदा, द्राक्ष परिषद होणार आहे. त्यात खासदार राजू शेट्टी, स्वाभिमानीचे प्रांताध्यक्ष डॉ. प्रकाश पोफळे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील. पश्चिम महाराष्ट्रात स्वाभिमानीची ऊस परिषद ज्ञात आहे. शेतकऱ्यांचे एकत्रित मंथन घडवून ठराव केले जातात. या परिषदा स्वाभिमानीला शेतकऱ्याशी नाळ जोडण्यात महत्त्वाच्या ठरल्या. तसा प्रयोग आता नाशिकमध्ये प्रथमच करण्यात येत आहे.

यापूर्वी स्वाभिमानीने जिल्ह्य़ात अनेकदा शेतकरी मेळावे घेतले आहेत. परंतु, परिषद पहिल्यांदा होत आहे, असे वडघुले यांनी सांगितले. शेतकरी अनेक प्रश्नांना तोंड देत आहे. निफाडमध्ये गेल्या वर्षी २० लाख मेट्रिक टन उसाचे उत्पादन झाले. पण, निफाड आणि रानवड सहकारी साखर कारखाना बंद असल्याने हा ऊस बाहेर पाठवावा लागला. शेतकऱ्यांना आजही त्याचे पैसे मिळालेले नाहीत. बंद पडलेले साखर कारखाने सुरू करण्याची प्रक्रिया रखडली आहे. भाव मिळत नसल्याने कांद्यासह भाजीपाला रस्त्यावर फेकण्याची वेळ आली आहे. द्राक्ष बागायतदारांची फसवणूक होत आहे. या संदर्भात सरकार मौन बाळगून असल्याने या परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

या परिषदेआधी सकाळी ११ वाजता शेट्टी हे ताहाराबाद, नामपूर बाजार समित्यांना भेट देणार आहेत. दुपारी एक वाजता बागलाण तालुक्यातील उत्राणे येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. संघटना राज्यभरात अशा परिषदांचे आयोजन करणार आहे. त्याची सुरुवात नाशिकमधून होत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.

मागण्यांचे ठराव

निफाड, रानवड कारखान्यात ऊस गाळप सुरू करावे, मागील वर्षी एफआरपीप्रमाणे राहिलेले पेमेंट मिळावे, शेतकऱ्यांना थेट कर्जपुरवठा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसींनुसार हमीभाव आदी मागण्यांचे ठराव केले जातील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2018 3:46 am

Web Title: sugarcane onion grape council in nifad tomorrow
Next Stories
1 रविवार कारंजा गणेशोत्सव शतकपूर्तीनिमित्त सायकल स्पर्धा
2 स्पर्धेसाठी शरीर-मन यांचा समन्वय आवश्यक
3 ..पुढच्या वर्षी लवकर या!
Just Now!
X