टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळत शिंदे पळसे येथील दिव्यांग महिला शिक्षिकेने राहत्या घरात गळफास घेतल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संशयित गृहरक्षक पंकज ठाकूरला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. संबंधित शिक्षिकेच्या तक्रारीची पोलिसांनी वेळीच दखल नाही आणि त्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गावात निषेध मोर्चा काढत ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यातही गर्दी केली.

वंदना वामन जाधव (३३, रा. शिंदे पळसे) असे या शिक्षिकेचे नाव आहे. त्या सामनगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका होत्या. आपल्या शारीरिक व्यंगावर मात करत त्यांनी ज्ञानदानाचे काम सुरू ठेवले होते.

कामानिमित्त बाहेर ये-जा करताना त्यांची एकलहरा येथील पंकज ठाकूर या गृहरक्षक दलातील जवानाशी ओळख झाली. काही दिवसांपासून ठाकूरने त्यांच्या शारीरिक व्यंगावर बोट ठेवत छेडछाड काढण्यास सुरुवात झाली. याबाबत दोन महिन्यांपूर्वी त्यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात ठाकूरविरुद्ध तक्रार केली. पोलिसांनी त्याला समज देऊन सोडून दिले. या प्रकारानंतर पंकज वंदना यांना कधी भ्रमणध्वनीवर तर कधी घराजवळ एकटे गाठत शिवीगाळ, छेडछाड करू लागला. गुरुवारी संशयित थेट वंदना यांच्या शाळेत दाखल झाला. त्याने शिवीगाळ करत अश्लील भाषेत शेरेबाजी केली. या सर्व प्रकाराला कंटाळून वंदना जाधव यांनी रात्री उशिरा घरात आत्महत्या केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांशी संपर्क साधला.

या घटनेची माहिती गावात पसरल्यानंतर स्थानिक ग्रामस्थ जमा झाले. पोलिसांनी संशयितावर कठोर कारवाई केली असती तर हा अनर्थ टळला असता अशी संतप्त भावना व्यक्त केली.

या वेळी पोलिसांच्या कार्यशैलीचा निषेध व्यक्त करीत आरोपीला अटक करण्यासाठी ग्रामस्थांनी मोर्चा काढत नाशिक रोड पोलीस ठाण्यात धाव घेतली. गावातील फलकावर या घटनेचा निषेध करण्यात आला होता. दरम्यान, संशयित पंकजला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.