गंगापूर रस्त्यावरील घटना

गंगापूर रस्त्यावरील दालन फोडून चोरटय़ांनी सुमारे ७४ लाखाचे अ‍ॅपल कंपनीचे आयफोन, स्मार्ट घडय़ाळे, आणि पावणेदोन लाख रुपये असा ७५ लाखहून अधिकचा माल आणि रोकड लंपास केली.  बुधवारी पहाटे ही घटना घडली. महत्वाची बाब म्हणजे, व्यापारी संकुलात सुरक्षारक्षक तैनात असतांना ही घटना घडल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.

काही महिन्यात शहरात महिलांच्या अंगावरील सोनसाखळी खेचणे, जबरी लूट, चोरी अशा घटनांचा आलेख उंचावत आहे. गंगापूर रस्त्यावरील मध्यवर्ती भागातील घटनेने त्यात भर पडली आहे. गंगापूर रस्त्यावरील प्रसाद चौकालगत इलेमेन्ट हे अ‍ॅपलचे दालन आहे. शेजारी सराफी दालन आहे. तिथे सुरक्षारक्षक तैनात असतात. परिसरात सीसी टीव्हीची नजर असते. या ठिकाणी खासगी रुग्णालय आहे. रात्री परिसरात तुरळक वर्दळ असते. चोरटय़ांनी पहाटे ही जबरी लूट केल्याचा संशय आहे. या दालनाचे शटर मजबूत आहे. इलेक्ट्रिक मोटारच्या सहाय्याने ते उघड-बंद केले जाते. या एकंदर स्थितीत चोरटय़ांनी शटर उचकटून आतमध्ये प्रवेश केला. दालनातील एका खोक्यात ठेवलेले ७३ लाख ६४ हजार रुपये किंमतीचे भ्रमणध्वनी, हेडफोन, स्मार्ट घडय़ाळे चोरली. शिवाय गल्ल्यातील एक लाख ८३  हजाराची रक्कम चोरून नेली. ही बाब बुधवारी उघडकीस आली. या संदर्भात योगेश अहिरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती समजल्यानंतर पोलिसांनी धाव घेतली. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे हे देखील घटनास्थळी दाखल झाले. अ‍ॅपलसह आसपासच्या दालनातील सीसी टीव्हीतील चित्रणाच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला आहे. गुन्हे शाखा समांतर तपास करत आहे. परिसरातील भ्रमणध्वनी लोकेशन्सचा सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

आयफोनवर नजर

चोरटय़ांची नजर मुख्यत्वे अ‍ॅपल कंपनीच्या आयफोनवर होती. दालनातील लॅपटॉप, एलईडी स्मार्ट टिव्ही, भ्रमणध्वनीचे अन्य साहित्य आदींना चोरटय़ांनी हात लावला नाही. एका पेटीत ठेवलेले अ‍ॅपलचे सुमारे ८० आयफोन लंपास केले. काही महागडी घडय़ाळे चोरटय़ांनी लंपास केली. इतर कोणतेही भ्रमणध्वनी आणि अ‍ॅपलचा आयफोन यामध्ये कमालीचा फरक आहे.