लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : शहरातील जुने नाशिक येथील तांबट गल्लीत असलेल्या जुन्या वाडय़ाला गुरुवारी दुपारी आग लागली. आगीमुळे वाडय़ातील सागवानाचे नुकसान झाले. विशेष म्हणजे, वर्षभरात या वाडय़ास तिसऱ्यांदा आग लागल्याने या वाडय़ातच असे प्रकार का होत आहेत, असा प्रश्न परिसरातील रहिवाशांना पडला आहे.

जुन्या नाशिक येथील तांबट गल्लीत सुनील जगदाने यांचा वडिलोपार्जित वाडा आहे. वाडय़ाची दुरावस्था होत असल्याने जगदाने हे अन्य ठिकाणी राहण्यास गेले आहेत. कोणीही राहत नसल्याने वाडय़ाची अवस्था दयनीय झाली असून तेथील वीज जोडणी, पाणी अशा अन्य सुविधा तोडण्यात आल्या आहेत. याआधी या ठिकाणी दोन वेळा आग लागली होती.

गुरूवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास या घटनेची पुनरावृत्ती झाली. अचानक वाडय़ातून  धुराचे लोट येऊ लागल्याने परिसरातील नागरिकांनी अग्नीशमन विभागाला कळविले. अग्नीशमन बंब घटनास्थळी दाखल होईपर्यंत वाडय़ातील सागवानाचे बांधकाम खाक झाले होते. कोणीही  या ठिकाणी राहत नसल्याने  जिवीतहानी झाली नाही. आगीची तीव्रता अधिक असल्याने दुसरा बंब बोलविण्यात आला.

रस्त्यांवरील खोदकाम आणि अरुंद रस्ते यामुळे या ठिकाणी बंब पोहचण्यात अडचणी आल्या. एक तासाच्या अथक प्रयत्नांनी आग नियंत्रणात आली. अग्नीशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याच वाडय़ात आग लागण्याची ही तिसरी घटना असल्याचे सांगितले. वाडय़ात कोणी राहत नसतांना आग लागत असल्याने कोणाचा तरी हा खोडसाळपणा असू शकतो, अशी शक्यता त्यांनी वर्तविली. या आगीमुळे परिसरातील धोकादायक वाडय़ांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.