करोना आणि विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरात आज कडेकोट बंदोबस्त; मिरवणुकीस प्रतिबंध

नाशिक : करोनाच्या सावटात गणेशोत्सव शांततेत साजरा झाला असला तरी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देताना गणेशभक्तांची गर्दी रोखण्याचे आव्हान यंत्रणांसमोर आहे. विसर्जन मिरवणुकीस प्रतिबंध आहे. यामुळे गर्दी रोखली जाईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तयारी यंत्रणेने केली आहे.

करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने गणेशोत्सव साजरा करताना विविध पातळीवर खबरदारी घेण्याचे आवाहन यंत्रणांनी केले होते. परंतु, गणेश चर्तुथी आणि त्याआधीचे दोन-तीन दिवस बाजारात कमालीची गर्दी उसळली. त्याची पुनरावृत्ती गणेश विसर्जनाच्या दिवशी होऊ नये, यासाठी पोलीस, महापालिका प्रयत्नरत आहे. १० दिवस मुक्काम करणाऱ्या गणरायाला मंगळवारी निरोप दिला जाणार आहे. करोनामुळे यंदा प्रथमच वेगळ्या नियमावलीत गणेशोत्सव साजरा करावा लागला. घरगुती गणेशमूर्ती दोन फूट आणि सार्वजनिक गणेश मंडळांसाठी चार फूट उंचीची मर्यादा घालून दिली

गेली. विसर्जन मिरवणूक काढण्यास बंदी आहे. कुठेही बँडबाजा वाजणार नाही वा मिरवणूक निघणार नाही, याची खबरदारी घेतली जाणार आहे. या दिवशी कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.  विसर्जनासाठी एकाच वेळी गर्दी होऊ नये म्हणून यंदा प्रथमच विसर्जनाची वेळ ऑनलाइन नोंदणीची व्यवस्था करण्यात आली. त्यास प्रतिसाद मिळाला. सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मूर्ती दान उपक्रम राबविला जाणार आहे.

विसर्जनावेळी नागरिक कुटुंबीयांसह मोठय़ा संख्येने सहभागी होतात. गर्दीत सुरक्षित अंतराचे पथ्य पाळले जात नाही. काही जण मुखपट्टी परिधान करण्याचे तारतम्य बाळगत नाही. विसर्जनावेळी एकाच वेळी गर्दी रोखण्यासाठी घरातच मूर्तीचे विसर्जन करावे, पीओपीच्या मूर्ती घरातच विसर्जित  करता याव्यात म्हणून महापालिकेने अमोनियम बायकाबरेनेटचे मोफत वितरण केले आहे. विसर्जनाच्या दिवशी नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे म्हणून बंदोबस्ताचे सविस्तर नियोजन करण्यात आले आहे. विसर्जन मिरवणूक निघणार नसल्याने पोलिसांचा ताण बराच कमी होईल. करोनाच्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन व्हावे यादृष्टीने यंत्रणा सजग झाली आहे.

शहरात पोलीस आयुक्त विश्वास नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली चार उपायुक्त, सहा साहाय्यक आयुक्त, २६ निरीक्षक, ७९ उपनिरीक्षक, १०९६ पोलीस कर्मचारी, २१७ महिला पोलीस, ४१३ गृहरक्षक दलाचे जवान, एक राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी, आठ स्ट्रायकिंग फोर्सेस, दोन शीघ्र कृती दलाच्या तुकडय़ा, ३१ वाहने असा बंदोबस्त तैनात राहणार आहे. नैसर्गिक तलावाजवळ जीवरक्षक, स्वयंसेवक, बोटींची व्यवस्था, वैद्यकीय पथक कार्यरत राहील. विसर्जन स्थळापासून काही अंतरावर वाहने रोखली जातील. त्यासाठी लोखंडी जाळ्या, लाकडी बल्ल्या लावण्याचे काम पूर्वसंध्येला सुरू होते.

नदी प्रदूषण रोखण्याचे आवाहन

महापालिकेने पंचवटी विभागात १० नैसर्गिक (आठ कृत्रिम), नाशिक पूर्वमध्ये पाच (पाच),  नाशिकरोड सात (चार), नवीन नाशिक एक (पाच), नाशिक पश्चिम सहा (सहा), सातपूर विभागात चार (चार)  तलावांची उपलब्धता करण्यात आली आहे. या ठिकाणी गणेशभक्तांनी मूर्ती विसर्जन करून नदीचे प्रदूषण रोखण्यास सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संचालक डॉ. कल्पना कुटे यांनी केले आहे.

गणेश विसर्जनासाठी बंदोबस्ताचे सविस्तरपणे नियोजन करण्यात आले आहे. विसर्जनस्थळांसह शहरात सर्वत्र पोलीस तैनात असतील. नागरिकांना सूचना देण्यासाठी ध्वनिक्षेपक यंत्रणा, जीवरक्षक, स्वयंसेवक, वैद्यकीय पथक आदींची व्यवस्था राहणार आहे. विसर्जन मिरवणुकीला बंदी आहे. कुठेही मिरवणूक निघणार नाही.

– विश्वास नांगरे, (पोलीस आयुक्त)