News Flash

पर्यावरण दिनानिमित्त विविध संस्था, संघटनांकडून वृक्षारोपण

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत शहरासह जिल्ह्य़ात विविध संस्था, संघटनांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.

शहरातील एच.पी.टी. महाविद्यालय परिसरात क्रीडाप्रेमींच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.

काही संस्थांच्या वतीने ‘झाडे वाचवू या मोहीम’;  नाशिक पुन्हा हिरवेगार करण्याचा संकल्प

नाशिक : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत शहरासह जिल्ह्य़ात विविध संस्था, संघटनांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. तसेच पर्यावरण रक्षणासंबंधी मार्गदर्शनही करण्यात आले. काही संस्थांच्या वतीने झाडे वाचवू या मोहीम सुरु करण्यात आली.

झाडे वाचवू या मोहीम

पर्यावरण दिनाच्या औचित्याने नाशिकरोडच्या शिखरेवाडी परिसरातील उद्यानालगत दुतर्फा रस्त्यावर झाडे वाचवू या उपक्रमास उत्तुंग झेप संस्थेच्या वतीने सुरुवात करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष रोहन देशपांडे यांची ही संकल्पना आहे.परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत मोहिमेत सहभाग नोंदवला. यावेळी पिंपळ, बकुळ, बहावा अशा पाच देशी वृक्षांची रोपे लावण्यात आली. त्यांचे रक्षण, संवर्धन करण्याची प्रतिज्ञाही घेण्यात आली. झाडे वाचवू या मोहिमेला महापालिकेचा उद्यान विभाग, पर्यावरणप्रेमी, पर्यावरण तज्ज्ञ आणि परिसरातील नागरिकांचे सहकार्य लाभले. यावेळी रोहन देशपांडे यांनी मार्गदर्शन के ले. बऱ्याचदा अनेक जुने वृक्ष उन्मळून पडतात. काही कारणांनी वृक्ष हलविण्याची वेळ येते. त्यांचे पुनर्रोपण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मनपाचे उपायुक्त शिवाजी आमले, विजय गायकवाड, शेख, गिरी उपस्थित होते. पर्यावरण तज्ज्ञ अश्विनी भट यांच्या सूचनेनुसार उन्मळून पडलेल्या झाडांच्या मुळांजवळ जुनी बारदाने ओली करुन गुंडाळण्यात आली. शहर, परिसरात अनेक झाडे वादळी पावसाने उन्मळून पडतात. बऱ्याचदा जुने वृक्ष वाचविण्याची गरज असते. त्यासाठी  पर्यावरणप्रेमी नागरिकांनी आदित्य कुलकर्णी यांना ८३०८२५२६७५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. उत्तुंग झेप संस्थेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांंचा चमू तेथे पोहोचेल. झाडांचे विनामूल्य पुनर्रोपण केले जाईल. नवीन झाडे लावण्याबरोबरच जुने वृक्ष वाचविणे व त्यांचे रक्षण, संवर्धन करणे तेव्हढेच महत्वाचे आहे, असेही देशपांडे यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे २१०० झाडे लावण्याचे उद्दिष्ट

राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांंच्या सोबतीने शहरातील विविध भागात वृक्षारोपण केले. १५ दिवसात शहरात २१०० वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करण्याचे उद्दिष्ट असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब महाले, निवृत्ती अरिंगळे, शहर सरचिटणीस संजय खैरनार, अंबादास खैरे, धनंजय निकाळे, डॉ.अमोल वाजे उपस्थित होते. करोनामुळे सर्वांना पर्यावरणाचे महत्व लक्षात आले आहे. शहरात वृक्षसंवर्धनाची जबाबदारी पक्षाचे संबधित पदाधिकारी आणि कार्यकर्ते घेणार आहेत. दशकापासून वाढती लोकसंख्या, वाढते नागरीकरण यामुळे नाशिकमधील प्रदूषणात वाढ झाली असून वृक्षतोड सुरु झाली आहे. पाण्याची पातळी दिवसेंदिवस खाली जात आहे. परिणामी नाशिकचे वातावरण दमट होऊ लागले आहे. हवेतील नैसर्गिक प्राणवायूचे प्रमाण वाढविण्याकरिता आणि नाशिककरांच्या सदृढ आरोग्यासाठी प्रदूषणमुक्त हवा महत्वाची असल्याने झाडांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. पावसाळ्यात अधिक वृक्षारोपण आणि संवर्धन करून नाशिक पुन्हा हिरवेगार करण्याचा संकल्प ठाकरे यांनी केला आहे.

नेचर क्लबतर्फे देशी वृक्षांचे रोपण

नेचर क्लब ऑफ नाशिक संस्थेच्या वतीने वृक्ष संवर्धनासाठी नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात देशी वृक्षांच्या रोपांचे रोपण करण्यात आले. महाराष्ट्राचा राज्य वृक्ष ताम्हण या वृक्षाच्या रोपाचे रोपण वन विभागाचे वन्यजीव संरक्षक अनिल अंजनकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावर्षी संस्थेतर्फे नाशिकमध्ये पाच हजार ताम्हण वृक्ष लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्याची सुरुवात पक्षी अभयारण्यापासून करण्यात आल्याचे संस्थेचे अध्यक्ष प्रा.आनंद बोरा यांनी सांगितले. यावेळी सहायक वनसंरक्षक धोंडीराम शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रथमेश हडपे, वनपाल अशोक काळे, डॉ. जयंत फुलकर यांच्या हस्ते कदंब, हेरडा, बेहडा, काळा कुडा, काटेसावर, कांडोळ, बहावा अशा १५ जातीच्या वृक्षांची रोपे लावण्यात आली. यावेळी निवृत्त जिल्हा न्यायाधीश देशमुख यांच्या सहकार्यामुळे मार्गदर्शक आणि वन संरक्षक पथकाला मान्यवरांच्या हस्ते गणवेश देण्यात आले. यावेळी क्रिशी बोरा, साहिल झरे, अमोल दराडे, गंगाधर अघाव, अमोल डोंगरे आदी उपस्थित होते.

क्रीडाप्रेमींतर्फे  वृक्षारोपण

पर्यावरण दिनानिमित्त शहरातील एच.पी.टी. महाविद्यालय परिसरात  विविध उपक्रम राबविणाऱ्या क्रीडाप्रेमींच्या वतीने जनलक्ष्मी बँकेचे संचालक शरद गांगुर्डे यांच्या  हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव समीर रकटे,  प्रा. बाळासाहेब मुरकुटे, बल्ली सिंग, अशुतोष पाटील, दत्तू आंधळे, विजू आणि रवी पडवळ, उदय खरे व मित्र परिवार आदी उपस्थित होते. शरद गांगुर्डे यांनी आपण सर्वानी एकत्रित येऊन सामाजिक जबाबदारी म्हणून काही ना काही विविध उपक्रम राबविले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त के ली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 12:58 am

Web Title: tree planting various organizations occasion environment day ssh 93
Next Stories
1 करोना योद्ध्यांच्या रक्षणार्थ सक्रिय पुढाकार  
2 करोना संशयितांच्या शोधासाठी स्मार्ट हेल्मेटचा वापर
3 भाजपचे ‘नंदिनी नदी’ पुनरुज्जीवन आणि संवर्धन अभियान
Just Now!
X