|| अनिकेत साठे

करोना चाचणी टाळण्याकडे कल

नाशिक : करोनाच्या गैरसमजातून आदिवासी भागात बाधित रुग्णांना वाळीत टाकण्याचे प्रकार घडत आहेत. वाड्यापाड्यात अज्ञानपणामुळे करोना चाचणी आणि लसीकरणाविषयी गैरसमज होत आहे. बागलाणच्या पश्चिम भागात तर गावात कुणी बाधित आढळल्यास त्या कुटुंबाला पाणी भरू दिले जात नाही. किराणा दुकानावर प्रवेश दिला जात नाही. भीतीमुळे करोना चाचणी केली जात नाही. यामुळे आदिवासी भागात मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचा दावा स्थानिक लोकप्रतिनिधी करीत आहेत.

जिल्ह्यात पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, कळवण, बागलाण हे आदिवासीबहुल तालुके आहेत. काही घटकांनी गैरसमज पसरविल्याने रुग्णांवर उपचार, लसीकरणाचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या ३२ हजार ९५ आहे. त्यात त्र्यंबकेश्वर ३३२, सुरगाणा ४८३, इगतपुरी ४४२, बागलाण १२४७, कळवण ७९४ या तालुक्यात अन्य तालुक्यांच्या तुलनेत कमी रुग्ण आहेत. यामागे तपासणीसाठी पुढे न येण्याचे कारण असण्याचा अंदाज आहे. बागलाणच्या पश्चिम आदिवासी भागात गैरसमजातून लसीकरणास विरोध होत आहे. परिणामी करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना त्या भागातील ग्रामस्थ बाधितांना वाळीत टाकतात. यामुळे सामाजिक तेढ निर्माण होऊन वाळीत टाकण्याच्या भीतीने उपचाराअभावी मृत्यूचे प्रमाणदेखील वाढत असल्याकडे बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी लक्ष वेधले. पहिल्या लाटेत आदिवासी भागात नियमांचे काटेकोर पालन झाल्यामुळे करोनाचा शिरकाव झाला नाही. दुसऱ्या लाटेत मात्र करोना चाचणी आणि लसीकरणबाबत गैरसमज निर्माण झाल्यामुळे हा परिसर करोनाचा केंद्रबिंदू ठरत आहे. करोनाच्या जिल्हास्तरीय बैठकीत यावर चिंता व्यक्त झाली. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आदिवासी बांधवांमध्ये जनजागृतीची जबाबदारी स्थानिक लोकप्रतिनिधींवर सोपविली आहे.

तपासणीसाठी फिरते पथक

या भागात लसीकरणासाठी सूक्ष्म नियोजन करण्यास सांगण्यात आले. प्रत्येक आठवड्याला प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांवर ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागातर्फे आवर्तनानुसार लसीकरण करण्याबरोबर उपलब्ध लसीनुसार प्रतीक्षायादीही लावण्यात येणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत अहिरराव यांनी सांगितले. गैरसमज दूर करण्यासाठी प्रथम सरपंच, सदस्य, पोलीस पाटील, सहकारी संस्थांचे पदाधिकारी यांना लसीकरण करण्यात येईल. त्यानंतर त्यांच्या घरातील सदस्यांचे लसीकरण केले जाणार आहे. आदिवासी भागात करोना चाचण्या वाढविण्यासाठी फिरते आरोग्य पथक ठेवण्यात येणार आहे. जेणेकरून जास्तीत जास्त चाचण्या करून बाधितांवर उपचार करण्याची तयारी केली जात आहे.

सामाजिक तेढ

वाड्यापाड्यात करोनाबाधित आढळल्यास ग्रामस्थ त्यास वाळीत टाकतात. ग्रामस्थ वाळीत टाकतील या भीतीने करोना चाचणी केली जात नाही. यामुळे बागलाणच्या पश्चिम भागात १४७ रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दावा आमदार दिलीप बोरसे यांनी केला आहे. यासाठी प्रशासकीय पातळीवर तत्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे. अन्यथा करोनाचा उद्रेक होऊन परिस्थिती हाताबाहेर जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.