16 January 2021

News Flash

भाविकांअभावी त्र्यंबकेश्वरचे अर्थचक्र अजूनही रुतलेले

किमान देवदर्शनासाठी मंदिर सुरू करण्याची तसेच पूजाविधी करू देण्याची मागणी

किमान देवदर्शनासाठी मंदिर सुरू करण्याची तसेच पूजाविधी करू देण्याची मागणी

चारूशीला कुलकर्णी, लोकसत्ता

नाशिक : टाळेबंदी सहाव्या टप्प्यात काहीशी शिथिल करण्यात आली असली तरी त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढल्याने अनेक ठिकाणी पुन्हा टाळेबंदी करण्यात आली आहे. यामुळे जे शहर, गावांची अर्थव्यवस्था पूर्णत: पर्यटक, भाविकांवर अवलंबून आहे, त्यांची अवस्था दिवसागणिक बिकट होत आहे. बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असणाऱ्या त्र्यंबकेश्वरचे अर्थचक्र भाविकांअभावी थांबले आहे.

देशभरातून विविध धार्मिक विधींसाठी भाविक त्र्यंबक नगरीत येतात. टाळेबंदीमुळे साडेतीन महिन्यांपासून नगरीचे अर्थचक्र गाळात रुतले आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरही दर्शनासाठी बंद असल्याने श्रावण महिन्यातही अशीच स्थिती राहील काय, याची चिंता स्थानिकांना आहे. किमान देवदर्शनासाठी मंदिर खुले करा, पूजाविधीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे.

त्र्यंबक शहराची लोकसंख्या ५० हजारांच्या आसपास असून या ठिकाणी धार्मिक पर्यटनामुळे लाखो लोकांची मांदियाळी कायमच असते. चातुर्मासात तर भाविकांची गर्दी कळस गाठते. करोनाच्या संकटाने या गर्दीची वाट रोखली आहे. त्र्यंबक नगर परिषदेने सुरुवातीपासून जिल्हा प्रशासन, राज्य सरकार, केंद्र सरकारच्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्यावर भर दिला. शहरातील अर्थकारणाचे केंद्रस्थान असलेले त्र्यंबक देवस्थान, पूजा विधी संपूर्णत: बंद आहे. नियम डावलत पूजा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. अत्यावश्यक सेवा म्हणून केवळ दूध विक्री, औषधालये सुरू आहेत. किराणा दुकानांसाठी नियम घालून दिले.

परिणामी, त्र्यंबक देवस्थान, पूजाविधी अवलंबून असलेले हॉटेल, लहान-मोठे खाद्य विक्रेते, पूजेचे सामान विकणारे, निवास, खानावळ, कापड व्यावसायिक, सराफी दुकाने असे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. त्यामुळे टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्यापर्यंत विशेषत: ग्रामीण भागात करोनाचा विळखा पडत असताना त्र्यंबक सुरक्षित राहिले होते. परंतु, काही दिवसांत त्र्यंबकमधील करोनाग्रस्त रुग्णांचा आकडा दोन आकडी झाल्याने नगरपालिका प्रशासनाने टाळेबंदी कडक केली.

श्रावण अवघ्या दहा दिवसांवर आला आहे. श्रावणात त्र्यंबकला भाविक मोठय़ा संख्येने येत असतात. त्र्यंबकराजाचे दर्शन, ब्रह्मगिरी प्रदक्षिणा, पूजाभिषेक या साऱ्यांवर टाळेबंदीमुळे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

या निमित्ताने अर्थचक्राला गती मिळाली असती तर नगरपालिका प्रशासन टाळेबंदीवर ठाम आहे. अर्थचक्राला गती मिळावी यासाठी त्र्यंबक वासियांकडून त्र्यंबकेश्वर मंदिर स्थानिकांसाठी खुले करा, पौरोहित्य करणाऱ्यांकडून पूजेला परवानगी द्यावी, व्यावसायिकांकडून दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी अशा मागण्या होत आहेत.

निवास-खानावळ संकटात

राज्यात हॉटेल सुरू करण्यास सशर्त परवानगी दिली असली तरी त्र्यंबकमध्ये हॉटेल पूर्णत: बंद आहे. त्र्यंबकमध्ये बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना बंदी असताना हॉटेल खुली का करायची? राहण्यासाठी केवळ ३५ लोकांची व्यवस्था करण्याची परवानगी, त्यांच्या जेवणा-खाण्याची व्यवस्था करता येणार नाही. मग हॉटेल खुली करण्याचे नाटक का, असा प्रश्न व्यावसायिक करत आहेत. धार्मिक विधींना बंदी आहे. शहरातील श्री गजानन महाराज देवस्थान, श्री स्वामी समर्थ केंद्र, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर देवस्थान, निवृत्तीनाथ महाराज मंदिर यासह मठातील मंदिरे बंद आहेत. कुशावर्त तीर्थस्थान बंद करण्यात आले आहे. धार्मिक पर्यटन होणार नसल्याने दुकाने, हॉटेल सुरू करून कोणताच फायदा नाही. श्रावणासाठी अनेकांनी कर्ज घेत आवश्यक सोयी सुविधा करून घेतल्या होत्या. मात्र हा सर्व खर्च यंदा अंगावर पडणार असे चित्र आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2020 12:05 am

Web Title: trimbakeshwar economy face crisis due to lack of devotees zws 70
Next Stories
1 जिल्ह्य़ाचा जलसाठा ३३ टक्क्य़ांवर
2 प्रतिजन चाचण्यांमुळे बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींच्या तपासणीला वेग
3 वाडय़ाची भिंत कोसळून एकाचा मृत्यू, एक जण जखमी
Just Now!
X