पहिल्यांदाच घरापासून इतके दिवस लांब राहिले. त्यात पुन्हा घरी परत येऊ की नाही ही धास्ती. आपल्यावर संपूर्ण कुटूंब भावनिकरित्या अवलंबून असतांना आपण सुरक्षित राहणे महत्वाचे आहे. आयुष्यातील या १५ दिवसात जगण्याचा अर्थ नव्याने समजला..

मालेगाव सामान्य रुग्णालयातील करोना कक्षात सेवा बजावून नाशिक येथील घरी परतलेल्या परिचारिका ज्योती वाघ यांनी ही भावना व्यक्त केली. गुरूवारी सायंकाळी त्या नाशिक येथे घरी परतल्यावर कुटुंबातील सदस्यांसह परिसरातील नागरिकांनी ‘करोना योध्दा’ म्हणून त्यांचे जोरदार स्वागत केले. या अनपेक्षित धक्क्याने सुखावलेल्या वाघ यांनी त्यांची मुले दिसताच अश्रुंना वाट मोकळी करून दिली.

या १५ दिवसांनी आपणास खुप काही शिकवल्याचे त्या सांगतात. करोना कक्षात काम करतांना पीपीई संचामुळे बराच त्रास झाला. चेहरारक्षक, मास्क यामुळे १२ तासाहून अधिक काळ पाणी न पिता राहावे लागले. करोना कक्षातील वातावरणही अधिक त्रासदायक होते. या ठिकाणी स्वतला सुरक्षित ठेवत करोनाबाधित रुग्णाचे मनोधैर्य वाढविणे म्हणजे एक आव्हानच. आपल्याला करोना झाला हे समजताच अनेक जण हतबल होऊन जातात. कुटूंबातील सदस्य त्या वेळेपुरते का होईना साथ सोडून जातात. त्यावेळी औषधोपचार पेक्षा मानसिक आधार देणे महत्वाचे असते. करोना रुग्ण कक्षात दाखल झाल्यावर नातेवाईक तेथेच त्याची साथ सोडून देतात. काही अपवाद आहेत. पण बहुतांश लोक हे रुग्ण बरा झाला तरी घरी घेऊन जाण्यास टाळाटाळ करत होते. सरकारी रुग्णालयातच कुठे व्यवस्था होते का, अशी विचारणा करतात. हे मानसिकदृष्टय़ा यातनादायी होते. ज्यांच्यासाठी काबाडकष्ट केले त्या व्यक्ती अशी साथ सोडतांना पाहून खूप त्रास झाला. काम करतांना वरिष्ठ आमची काळजी घेत होते. सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करत होते. १५ दिवसांचे कक्षातील काम संपल्यावरही घरी न परतता तपासणी करून घेतली. अहवाल नकारात्मक आल्यावरही स्वतला अलगीकरण करून घेतले. या काळात घरातील सदस्यांनी पाठिंबा दिला. घरी परतल्यावर अन्य लोकांच्या काय प्रतिक्रिया असतील या विषयी धास्ती होती. पण गुरूवारी घरी आल्यावर सर्वानी केलेल्या स्वागताने पुढील कामासाठी हिंमत वाढली आहे. कामावर पुन्हा रुजू होणार असून रुग्णसेवा हाच धर्म मानत अविरत काम करत राहणार असल्याचे वाघ यांनी नमूद केले.