बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावानंतर कारवाई

नाशिक : सटाणा तालुक्यातील वाठोडा येथे पाळीव कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूची लागण झाल्याचे उघड झाल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने बुधवारी वाठोड्याच्या एक किलोमीटर बाधित क्षेत्रातील सुमारे हजार ते १२०० कोंबड्या शास्त्रीय पद्धतीने नष्ट केल्या आहेत. बर्ड फ्लूचा फैलाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर ही पावले उचलण्यात आली. या भागात कुक्कुटपालन केंद्र नसून सर्व कोंबड्या या परसातील अर्थात घरगुती स्वरूपाच्या आहेत.

जानेवारीच्या मध्यावर जिल्ह्यातील काही भागात कावळे, पाणकोंबड्या, भारद्वाज, चिमणी, कोंबड्यांसह अन्य पक्षी मृतावस्थेत आढळले होते. परंतु वाठोडा वगळता कोणत्याही भागातील पक्ष्यांचा बर्ड फ्लूचा अहवाल सकारात्मक आलेला नाही. सटाणा तालुक्यातील वाठोडा परिसरातील घरगुती कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूची लागण झाल्याचे दिसून आल्यानंतर एक किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला. या परिसरात कुक्कुटपालन केंद्र नसल्याने घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी म्हटले होते. वाठोड्याचा अहवाल आल्यानंतर पशुसंवर्धन विभागाची आठ पथके वाठोडा परिसरात दाखल झाली. एक किलोमीटरच्या परिघात घरोघरी फिरून परसातील कोंबड्या संकलित करण्यात आल्या. जेसीबीच्या साहाय्याने खड्डे खोदून कोंबड्या शास्त्रीय पद्धतीने नष्ट करण्याची प्रक्रिया राबविली गेली. दिवसभरात हजार ते १२०० कोंबड्या नष्ट केल्या जातील, असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे यांनी सांगितले.

दरम्यान, बर्ड फ्लूचा फैलाव स्थलांतरित पक्ष्यांमुळे होतो. या पक्ष्यांना कुक्कुटपालन केंद्रात येण्यापासून रोखल्यास या आजाराचा प्रादुर्भाव टाळता येईल. कुक्कुटपालन केंद्रात नियमित साफसफाई, निर्जंतुकीकरण, विलगीकरणाची व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे डॉ. गर्जे यांनी म्हटले आहे.