तापमानातील चढ-उतार कायम

आठवडाभरापासून वातावरणात झपाटय़ाने बदल होत असून ढगाळ वातावरणामुळे कमी झालेला गारठा पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. ५ डिसेंबरला २० अंशावर गेलेले तापमान सध्या १५ अंशाच्या आसपास रेंगाळत आहे. एरवी डिसेंबरमध्ये जिल्ह्य़ात कडाक्याची थंडी असते. गतवर्षी या काळात तापमान ९.४ अंशापर्यंत खाली आले होते. यंदा मात्र तशी स्थिती अजून निर्माण झालेली नाही. तापमानात चढ-उतार कायम आहे.

या वर्षांत प्रत्येक हंगाम उशिरापर्यंत लांबला. दिवाळीत मुसळधार पावसाचा अनुभव घ्यावा लागला. अवकाळी पावसाने शेतीचे अतोनात नुकसान झाले. दरवर्षी दिवाळीनंतर गारवा वाढू लागतो. डिसेंबरमध्ये तर महिनाभर गारव्याची अनुभूती मिळते. काही वर्षांत याच महिन्यात नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. याच काळात खऱ्या अर्थाने थंडीची लाट येते. यंदा परतीचा पाऊस अनेक दिवस सुरू राहिल्याने थंडीही कडाक्याची असणार, असे सामान्यांना वाटत आहे.

दिवाळीनंतर थोडासा गारवा जाणवू लागला. मात्र पारा १० अंशाच्या खाली गेलेला नाही. तापमान १३ ते १४ अंशादरम्यान रेंगाळत आहे. बुधवारी १५.४ अंशाची नोंद झाली. तीन दिवसांपूर्वी पारा १३ अंशावर होता. तत्पूर्वी म्हणजे पाच तारखेला तापमान २० अंशावर होते. तापमानातील हे चढउतार थंडीचे अस्तित्व अधोरेखित करण्यास अवरोध ठरत आहे.

रात्री वातावरणात काहीसा गारवा जाणवतो. दिवसा मात्र वेगळे वातावरण असते. मध्येच ढग दाटत असल्याने पारा उंचावतो. उत्तर भारतातील शीत लहरींचा प्रभाव नाशिकच्या वातावरणावर पडतो. त्या भागातून वाहत येणाऱ्या वाऱ्यासह थंडीची लाट येते. यंदा हे समीकरण काही जुळलेले नाही.

अनेकदा जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या सुमारास नीचांकी पातळीची नोंद होते. गतवर्षी ती डिसेंबरच्या मध्यावर झाली होती. २०१७ मध्ये ११ डिसेंबर रोजी तापमान १४ अंश होते, तसेच २९ डिसेंबर रोजी ७.६ अंश होते. २५ जानेवारी २०१८ रोजी ७.२ या नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. २०१६च्या हंगामात ५.५ अंश हे नीचांकी तापमान होते. या वर्षी डिसेंबरच्या दुसऱ्या सप्ताहात तशी स्थिती नाही. गारव्याच्या धास्तीने उबदार कपडय़ांची मागणी वाढली आहे.

शेतकऱ्यांनाही धास्ती

शहरात दरवर्षी साधारणत: डिसेंबरमध्ये गारठा वाढतो. नाताळच्या जवळपास थंडीचा कडाका वाढतो. आठवडाभर १८ ते १९ अंशादरम्यान रेंगाळणारा पारा शनिवारपासून १५ अंशापर्यंत घसरला. गारठा वाढल्याने रब्बीतील गहू, हरभरा पिकांसाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. त्याचवेळी पारा सातत्याने असाच घसरत राहिल्यास थंडीत वाढ होईल. अवकाळी पावसामुळे खरिपासह बागायती पिकांची पुरती वाट लागली आहे. आता थंडीमुळे डिसेंबरच्या अखेरच्या टप्प्यात अडचणी यायला नको, अशी भीती शेतकरी व्यक्त करतात. ग्रामीण भागात थंडीचा कडाका अधिक असतो. ढगाळ वातावरण कमी होऊन थंडीचा कडाका वाढत असल्याने शेकोटय़ा पेटू लागल्या आहेत. लागोपाठच्या घटनांमुळे नोव्हेंबरमध्ये होणारे थंडीचे आगमन लांबले होते. मात्र आता थंडीची चाहूल लागली आहे.२०१६ च्या हंगामात ५.५ अंश हे नीचांकी तापमान होते. या वर्षी डिसेंबरच्या दुसऱ्या सप्ताहात तशी स्थिती नाही. गारव्याच्या धास्तीने उबदार कपडय़ांची मागणी वाढली आहे.